41 लाखांच्या चोरीच्या मुद्देमालासह घरफोडीच्या आरोपीस अटक

तीन महिन्यांत उत्तर मुंबईत आठ घरफोडी केल्याचे तपासात उघड

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
3 जून 2025
मुंबई, – सुमारे 41 लाखांच्या चोरीच्या मुद्देमालासह घरफोडीच्या गुन्ह्यांतील एका रेकॉर्डवरील आरोपीस मालाड पोलिसांनी अटक केली. रंजीतकुमार उपेंद्रकुमार सिंह ऊर्फ मुन्ना असे या 44 वर्षीय आरोपीचे नाव असून तो वेशांतर करुन विविध ठिकाणी घरफोडी करत असल्याचे उघडकीस आले आहे. गेल्या तीन महिन्यांत त्याने मालाड, कांदिवली, बोरिवली आणि दिडोंशी या उत्तर मुंबईत आठ घरफोडी केल्याची कबुली असून तो पहिल्यांदाच पकडला गेला आहे. त्याच्या अटकेने आठही घरफोडीच्या गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

17 मार्चला मालाडच्या गणपती मंदिर लेन, एन. एल शाळेजवळील एका इमारतीमध्ये घरफोडी झाली होती. अज्ञात चोरट्याने खिडकीतून प्रवेश करुन फ्लॅटमध्ये प्रवेश केला होता. कपाटातील सुमारे साडेचार लाखांचा मुद्देमाल चोरी करुन तो पळून गेला होता. दुसर्‍या दिवशी हा प्रकार उघडकीस येताच तक्रारदारांनी मालाड पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध घरफोडीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला होता. परिसरातील सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन पोलिसांनी रंजीतकुमार सिंह या व्यक्तीला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.

रंजीतकुमार हा मूळचा बिहारचा रहिवाशी असून सध्या मालाडच्या मालवणी, खारोडी, राठोडी गाव, श्री समथ्र वेल्फेअर सोसायटीमध्ये राहतो. दिवसा रेकी करुन तो रात्रीच्या वेळेस वेशांतर करुन विविध ठिकाणी घरफोडी करत होता. गेल्या तीन महिन्यांत त्याने मालाड व कांदिवली पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रत्येकी तीन, बोरिवली आणि दिडोंशी पोलीस ठाण्यात प्रत्येकी एक अशा आठ ठिकाणी घरफोडी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून पोलिसांनी 36 तोळे सोने, एक किलो चांदी, तेरा लाखांची कॅश, कटावणी, लोखंडी हातोडा, सोने वितळविण्याचे मशीन व इतर साहित्य असा सुमारे 41 लाखांचा चोरीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

तपासात त्याने त्याच्या मूळ गावी जमिन खरेदी केली असून त्यासाठी दहा लाख रुपये दिले होते. मालाडच्या मालवणी परिसरात त्याने सहा लाखांमध्ये एक रुम विकत घेतल्याचे तपासात उघडकीस आले आहे. रंजीतकुमार हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. घरफोडीसाठी तो बिहारहून मुंबईत येत होता. घरफोडीसाठी तो रेल्वे पटरीलगतच्या घराची निवड करत होता.

चोरीनंतर रेल्वे पटरीवरुन वेशांतर करुन पळून ता होता. आतापर्यंत तो कधीच पकडला गेला नाही. त्यामुळे त्याच्या अटकेने आठही घरफोडीच्या गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले. सोने आणि चांदी वितळविण्यासाठी त्यानेएक मशिन घेतले होते. त्याच्या घरातच तो सोने आणि चांदी वितळविण्याचे काम करत होता. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून कसून चौकशी सुरु आहे. त्याच्या चौकशीतून इतर काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी, अतिरिक्त पोलीस आयुक्त शशीकुमार मीना, पोलीस उपायुक्त आनंद भोईटे, सहाय्यक पोलीस आयुक्त हेमंत सावंत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयकुमार पन्हाळे, पोलीस निरीक्षक महेंद्र घाग, संजय बेडवाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक तुषार सुखदेवे, अंमलदार संतोष सातवसे, अमीत गावंड, अविनाश जाधव, पोलीस शिपाई महेश डोईफोडे, दलित पाईकराव, वैभव थोरात, आदित्य राणे यांनी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page