घरफोडीच्या गुन्ह्यांत आरोपीला दोन वर्षांचा कारावास
आरोपीविरुद्ध बाराहून अधिक घरफोडीसह इतर गुन्ह्यांची नोंद
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
1 डिसेंबर 2025
मुंबई, – घरफोडीच्या गुन्ह्यांत एका आरोपी अंधेरीतील लोकल कोर्टाच्या फास्ट्र ट्रक कोर्टाने दोषी ठरविले आहे. याच गुन्ह्यांत त्याला दोन वर्षांच्या कारावासासह पाचशे रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठवण्यात आली आहे. फरदीन ऊर्फ अमीत फिरदोस खान असे या 24 वर्षांच्या आरोपीचे नाव असून तो रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध बाराहून अधिक घरफोडीसह इतर गुन्ह्यांची नोंद असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनित घाडगे यांनी सांगितले.
सदफ बाबूलाल इनामदार ही महिला अंधेरी परिसरात राहते. 20 नोव्हेंबर 2024 रोजी तिचया घरातील कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने आतमध्ये प्रवेश केला होता. तिच्या घरातील सोन्याचे दागिने चोरी करुन या चोरट्याने पलायन केले होते. दुसर्या दिवशी घरफोडीचा हा प्रकार उघडकीस येताच सदफ इनामदार यांनी डी. एन नगर पोलिसांत तक्रार केली होती. तिच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनित घाडगे यांना देण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच अवघ्या 24 तासांत वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मचिंछर यांच्या मार्गदर्शनाखाली सुनित घाडगे व त्यांच्या सहकार्यांनी पवई येथून फरदीन खानला संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतले होते.
चौकशीत त्यानेच ही घरफोडी केल्याची कबुली दिली. या कबुलीनंतर त्याच्याकडून चोरीचे दागिने हस्तगत करण्यात आले होते. फरदीन हा पवईतील फिल्टरपाडा, करीमुल्ला चाळीत राहत असून रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध साकिनाका, पवई, डी. एन नगर पोलीस ठाण्यासह इतर ठिकाणी बाराहून अधिक घरफोडीच्या गुन्ह्यांची नोंद आहे. याच गुन्ह्यांत त्याच्याविरुद्ध अंधेरीतील लोकल कोर्टात आरोपपत्र सादर करण्यात आले होते. या खटल्याची फास्ट ट्रक कोर्टात सुनावली सुरु होती.
अलीकडेच या खटल्याची सुनावणी पूर्ण झाली होती. यावेळी मा. प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी दहाच्या कोर्टचे न्या. एस. जी अगरवाल यांनी फरदीनला घरफोडीच्या गुन्ह्यांत दोषी ठरविले होते. त्यानंतर त्याला दोन वर्षांच्या कारावासासह पाचशे रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. या खटल्यात सरकारी अभियोक्ता म्हणून फिरोज शेख यांनी काम केले तर तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनित घाडगे यांनी आरोपीविरुद्ध भक्कम पुरावे गोळा करुन ते कोर्टात सादर केले होते. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मधुकर आव्हाड, पोलीस शिपाई नागेश पंडित यांनी कोर्टाचे कामकाज पाहिले.