घरफोडीच्या गुन्ह्यांतील आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश

तिघांना अटक तर आठ घरफोडीच्या गुन्ह्यांची उकल

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
7 ऑगस्ट 2025
ठाणे, – घरफोडीच्या गुन्ह्यांतील एका आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश ठाण्याच्या गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी तीन रेकॉर्डवरील गुन्हेगारांना पोलिसांनी अटक केली आहे. महेंद्रकुमार थानाराम मेघवाल, राजेश ऊर्फ अण्णा बबन कदम आणि गणेश धुला पाटीदार अशी या तिघांची नावे आहेत. यातील राजेश हा कांदिवली तर इतर दोन्ही आरोपी राजस्थानचे रहिवाशी आहेत. या तिघांच्या अटकेने नवी मुंबई, पुणे आणि छत्रपती संभाजीनगर शहरातील आठहून अधिक घरफोडीच्या गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी साडेदहा लाखांचा चोरीचा मुद्देमालासह गुन्ह्यांतील बाईक हस्तगत केली आहे. या टोळीने अलीकडेच ठाण्यातील एका सिगारेट गोदामातून सुमारे 51 लाखांचा सिगारेटचा साठा चोरी केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

ठाण्यातील बाटा कंपाऊंड, राबोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सिद्धनाथ मार्केटिंग नावाच्या एका वितरक कंपनीच्या गोदामात चोरी झाली होती. अज्ञात व्यक्तीने कंपनीच्या गोदामात प्रवेश करुन सुमारे 51 लाखांचा सिगारेटचा माल चोरी करुन पलायन केले होते. 15 जुलैला घडलेल्या या घटनेनंतर कंपनीच्या वतीने राबोडी पोलिसारंत तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा नोंदवून पळून गेलेल्या आरोपींचा शोध सुरु केला होता. घरफोडीच्या वाढत्या तक्रारीची पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी गंभीर दखल घेत स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले होते.

या आदेशानंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटिव्ही फुटेजच्या मदतीने आरोपींची ओळख पटविण्यासाठी प्रयत्न सुरु केले होते. या फुटेजमध्ये चार आरोपींचा सहभाग उघडकीस आला होता. त्यांनी चोरीचा मुद्देमाला नेण्यासाठी एका टेम्पोचा वापर केला होता. आरोपी टेम्पो घेऊन मिरारोडच्या दिशेने गेल्याचे उघडकीस आले होते. हाच धागा पकडून पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड, त्याचे सहकारी पोलीस उपनिरीक्षक दिपक घुगे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दयानंद नाइ्रक, दिपक जाधव, सुनिल माने, पोलीस हवालदार संदीप महाडिक, दिपक जाधव, शशिकांत सावंत, बाळू मुकणे, पोलीस शिपाई मयुर लोखंडे, सागर सुरळकर यांनी महेंद्र मेघवाल, राजेश कदम आणि गणेश पाटीदार या तिघांनाही संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतले होते.

चौकशीत त्यांचा या गुन्ह्यांत सहभाग उघडकीस आला होता. यातील महेंद्रकुमार आणि राजेश हे विविध शहरात जाऊन सिगारेट अथवा मोबाईल गोदामाची रेकी करुन घटनास्थळाजवळ असलेल्या पार्किंगमधून वाहन चोरी करुन, त्या वाहनाचा वापर गुन्ह्यांसाठी करत होते. ही टोळी विविध शहरातील गोदामावर घरफोडी करत होती. काम झाल्यानंतर ते मुंबईतील विविध लॉजमध्ये राहत होते. अटकेच्या भीतीने एकाच ठिकाणी ते जास्त दिवस राहत नव्हते. घरफोडी करणारी ही आंतरराज्य टोळी असून या टोळीने अनेक शहरात घरफोडी केल्याची कबुली दिली. अलीकडेच त्यांनी नवी मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर येथे घरफोडी केल्याचे सांगितले. त्यांच्या अटकेने राबोडी, वागळे इस्टेट, चाकण, बावधन, हिंजवडी, वाशी, एमआयडीसी पोलीस ठाण्यातील आठ घरफोडीच्या गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले. त्यांच्याकडून पोलिसांनी मोठ्या प्रमाणात सिगारेटचा साठा, चांदीचे दागिने, कॅश, गुन्ह्यांत वापरलेली बाईक, मोबाईल असा साडेदहा लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

या तिघांनी त्यांचे सहकारी महावीर जोरसिंग कुमावत, धर्मेश जैसुफभाई शिराया, ब्रिजेश भरवरलाल गुर्जर यांच्या मदतीने आणखीन सात ठिकाणी घरफोडी केल्याची कबुली दिली आहे. यातील महेंद्रकुमारविरुद्ध मुंबईसह ठाणे, गुजरात, ठाणे ग्रामीणच्या विवधि पोलीस ठाण्यात चौदा तर राजेश कदमविरुद्ध सातारा, पुणे, ठाणे, मुंबई, रत्नागिरीच्या विविध पोलीस ठाण्यात 24 हून अधिक घरफोडीच्या गुन्ह्यांची नोंद आहे. अटकेनंतर या तिघांनाही लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. या तिघांच्या अटकेनंतर त्यांच्या इतर सहकार्‍यांच्या अटकेसाठी आता पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page