मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२१ सप्टेंबर २०२४
मुंबई, – घरफोडीसह विनयभंगाच्या दोन गुन्ह्यांतील आरोपींना खार पोलिसांनी अटक केली. राजू रघुवीर दास आणि मोहम्मद हारमतुल्ला हारुन शेख अशी या दोघांची नावे आहेत. अटकेनंतर या दोघांनाही वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी राजूला कोर्टाने पोलीस तर मोहममद हारमतुल्ला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. राजूकडून पोलिसांनी चोरीचा लॅपटॉप आणि आयपॅड असा दोन लाख तीस हजार रुपयांचा चोरीचा मुद्देमाल जप्त केल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव धुमाळ यांनी सांगितले.
कार्तिक रमेश हे वांद्रे येथे राहत असून ११ सप्टेंबर रात्री उशिरा त्यांच्या घरी घरफोडी झाली होती. अज्ञात व्यक्तीने घरात प्रवेश करुन दोन लाखांचा लेनोवो कंपनीचा लॅपटॉप आणि तीस हजार रुपयांचा ऍपल कंपनीचा आयपॅड चोरी करुन पलायन केले होते. याप्रकरणी घरफोडीचा गुन्हा नोंद होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव धुमाळ यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ता कोकणे व अन्य पोलीस पथकाने सांताक्रुज येथून राजू दासला ताब्यात घेतले. चौकशीत त्यानेच ही घरफोडी केल्याची कबुली देताना चोरीचा सर्व मुद्देमाल पोलिसांच्या स्वाधीन केला. अटकेनंतर त्याला वांद्रे लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
दुसर्या घटनेत एका तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी मोहम्मद हारमतुल्लाला पोलिसांनी अटक केली. तक्रारदार तरुणी ही शुक्रवारी वांद्रे येथील कार्टर रोडवर फिरण्यासाठी आली होती. यावेळी मोहम्मद हारमतुल्लाने तिच्याशी जवळीक साधून तिची छेड काढून तिचा विनयभंग केला होता. या घटनेनंतर तिने आरडाओरड करुन त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र तो पळू लागला. हा प्रकार तिथे गस्त घालणार्या पोलीस हवालदार महेश गायकवाड आणि पोलीस शिपाई अनिकेत गायकवाड यांच्या लक्षात येताच त्यांनी पळून जाणार्या मोहम्मद हारमतुल्लाला ताब्यात घेतले. तरुणीच्या चौकशीतून विनयभंगाचा हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर या तरुणीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी त्याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली. अटकेनंतर त्याला शनिवारी वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले. विनयभंग करुन पळून जाणार्या पोलीस हवालदार महेश गायकवाड आणि पोलीस शिपाई अनिकेत गायकवाड यांच्या कामगिरीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव धुमाळ यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी कौतुक केले आहे.