शेअर व्यावसायिकाच्या घरी 41 लाखांची घरफोडी

पळून गेलेल्या मुख्य संशयिताला अटक व कोठडी

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
8 फेब्रुवारी 2026
मुंबई, – विलेपार्ले येथे राहणार्‍या एका वयोवृद्ध शेअर व्यावसायिकाच्या घर अवघ्या अर्ध्या तासांच्या अंतराने सुमारे 41 लाखांचा मुद्देमाल चोरी करुन पळून गेलेल्या एका मुख्य संशयित आरोपीला विलेपार्ले पोलिसांनी अटक केली. मोहम्मद शाकीर शेख असे या आरोपीचे नाव असून अटकेनंतर त्याला वांद्रे येथील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याची पोलिसांकडून कसून चौकशी सुरु असून त्यांच्याकडून लवकरच पोलिसांकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला जाणार असल्याचे सांगण्यात आले.

ही घटना 19 जानेवारीला सायंकाळी पावणेसात ते सव्वासातच्या सुमारास विलेपार्ले येथील प्रार्थना समाज रोड, इंदू भवनसमोरील पाठारे बंगल्यात घडली. या बंगल्याच्या तळमजल्यावर 63 वर्षांचे वयोवृद्ध तक्रारदार प्रविण चंद्रकांत पाठारे हे तयांची पत्नी सेजल यांच्यासोबत राहतात. त्यांचा शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचा व्यवसाय आहे. 19 जानेवारी सायंकाळी साडेसहा वाजता ते हनुमान रोड येथे चहा पिण्यासाठी तर त्यांची पत्नी कामासाठी बाहेर गेली होती.

सायंकाळी सव्वासात वाजता त्यांची पत्नी सेजल यांनी त्यांना कॉल करुन त्यांच्या घरी चोरी झाल्याची माहिती दिली. त्यामुळे ते त्यांच्या घरी गेले होते. यावेळी त्यांना त्यांच्या फ्लॅटचे सेफ्टी आणि मेन डोअरचे लॉक तुटलेले दिसले. त्यांनी घरात जाऊन पाहणी केली असता आतमध्ये सर्व वस्तू अस्ताव्यस्त पडले होते. कपाटातील विविध सोन्याचे दागिने आणि इतर मुद्देमाल चोरीस गेल्याचे दिसून आले. कपाटातील दागिन्यांची पाहणी केल्यानंतर अज्ञात व्यक्तीने विविध सोन्याचे दागिने, चांदीचे सामान असा सुमारे 41 लाखांचा मुद्देमाल चोरी करुन पलायन केले होते.

हा प्रकार निदर्शनास येताच त्यांनी विलेपार्ले पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. त्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल केला होता. अज्ञात व्यक्तीने अवघ्या अर्ध्या तासांत घरात प्रवेश करुन 41 लाखांचा मुद्देमाल चोरी केला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपींचा शोध सुरु केला होता. परिसरातील सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन पोलिसांनी मोहम्मद शाकीर शेख याला संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यानेच ही घरफोडी केल्याची कबुली दिली. या कबुलीनंतर त्याला शनिवारी पोलिसांनी अटक केली.

अटकेनंतर त्याला रविवारी दुपारी वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहेत. या गुन्ह्यांत त्याला इतर कोणी मदत केली का, त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का, त्याने चोरीचा मुद्देमाल कोणाला विक्री केली आहे का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे. त्याच्याकडून लवकरच चोरीचा संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केला जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page