बँकेत तारण ठेवलेला फ्लॅट हेव्ही डिपॉझिटवर देऊन फसवणुक
45 लाखांना गंडा घालणार्या फ्लॅटमालकावर गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
9 सप्टेंबर 2025
मुंबई, – बँकेचे नियमित हप्ते न भरता तारण ठेवलेला फ्लॅट हेव्ही डिपॉझिटवर देऊन 45 लाखांच्या हेव्ही डिपॉझिटचा अपहार करुन एका व्यावसायिकाची त्याच्याच परिचित कापड व्यापारी असलेल्या फ्लॅटमालकाने फसवणुक केल्याचा प्रकार डोंगरी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी शेख फैय्याज मोहम्मद रफिक या फ्लॅटमालकाविरुद्ध डोंगरी पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. याच गुन्ह्यांत त्याची लवकरच पोलिसांकडून चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे.
मुस्तफा मोहम्मद दिल्लीवाला हे व्यवसायिक असून त्यांच्या कुटुंबियांश्रसोलबत डोंगरी परिसरात राहतात. त्यांचा मालाड येथे एक फ्लॅट होता, या फ्लॅटच्या विक्रीतून त्यांना 50 लाख रुपये मिळाले होते. त्यांचा व्यवसाय दक्षिण मुंबईत असल्याने त्यांना याच परिसरात एक हेव्ही डिपॉझिटवर भाड्याने फ्लॅटची गरज होती. याच दरम्यान त्यांची कापड व्यापारी असलेल्या शेख फैय्याजशी ओळख झाली होती. त्यांनी त्याला हेव्ही डिपॉझिटवर फ्लॅट असेल तर मदत करण्याची विनंती केली होती. शेख फैय्याजला त्याच्या ड्रेस मटेरियल व्यवसायासाठी पैशांची गरज होती, त्यामुळे त्याने त्याचा फ्लॅट हेव्ही डिपॉझिटवर देण्याचे आश्वासन दिले होते. त्याच्या फ्लॅटची किंमत दिड कोटी असून सर्व सामानाने सुसज्ज आहे. त्यामुळे त्यांचे पैसे कुठेही जाणार नाही. योग्य वेळेस हेव्ही डिपॉझिटची रक्कम त्यांना परत केली जाईल असे सांगितले. फ्लॅटची पाहणी केल्यानंतर त्यांनी त्याच फ्लॅटसाठी त्याला 45 लाख रुपये दिले होते.
12 सप्टेंबर 2023 रोजी त्यांच्यात फ्लॅटचे रजिस्टर अग्रीमेंट झाले होते. त्यात या दोघांची तर साक्षीदार म्हणून त्याची पत्नी शेख शहनाझा फैय्याज आणि भाऊ रियाज शेख यांची स्वाक्षरी होती. कायदेशीर करार झाल्यानंतर मुस्तफा दिल्लीवाला त्यांच्या कुटुंबियांसोबत तिथे राहण्यासाठी गेले होते. तिथे राहत असताना शेख फैय्याजने त्या फ्लॅटवर कर्ज काढून बँकेत तारण म्हणून फ्लॅट ठेवल्याचे समजले होते. या कर्जाची हप्ते भरले जात नसल्याने बँकेने त्यांना नोटीस पाठविली होती. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी त्याच्याकडे हेव्ही डिपॉझिटची रक्कम मागून फ्लॅट खाली करतो असे सांगितले होते. मात्र वारंवार पैशांची मागणी करुनही तो त्यांना हेव्ही डिपॉझिटची रक्कम परत करत नव्हता. त्याला व्यवसायात प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे त्याला पैसे परत करता येत नसल्याचे सांगून तो त्यांना टाळण्याचा प्रयत्न करत होता.
तसेच त्याच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार केल्यास त्याच्यासह त्याच्या पत्नी आणि भावाला फसवणुकीच्या गुन्ह्यांत अटक न होता फक्त नोटीस दिली जाईल असे सांगत होता. बँकेत तारण ठेवलेला फ्लॅट हेव्ही डिपॉझिट देऊन, कर्जाचे हप्ते न भरता त्याने त्यांची फसवणुक केली होती. त्यांच्या हेव्ही डिपॉझिटचा अपहार केला होता. त्यामुळे त्यांनी त्याच्याविरुद्ध डोंगरी पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पोलिसांनी शेख फैय्याजविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून त्याची पोलिसांकडून लवकरच चौकशी होणार आहे.