मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२६ डिसेंबर २०२४
मुंबई, – हेव्ही डिपॉझिटच्या सुमारे अकरा लाखांचा अपहार करुन एका ६३ वर्षांच्या वयोवृद्धाची फसवणुक झाल्याचा प्रकार मालाडच्या मालवणी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी फरहा हसीन अन्वर सिद्धीकी या फ्लॅट मालकिणीविरुद्ध मालवणी पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. याच गुन्ह्यांची तिची लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार आहे. या चौकशीनंतर तिच्यावर अटकेची कारवाई केली जाईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.
यातील तक्रारदार वयोवृद्ध छोटेलाल सुखदेवप्रसाद गुप्ता हे मालाडच्या मालवणी, एमएचबी कॉलनीत राहतात. एका खाजगी कंपनीतून ते निवृत्त झाले आहेत. गेली दहा वर्ष एकत्र कुटुंबात राहताना त्यांची गैरसोय होत असल्याने ते दुसर्या फ्लॅटच्या शोधात होते. यावेळी स्थानिक एजंटच्या मदतीने त्यांनी त्यांना फरहा हसीन या महिलेच्या मालकीचा एक फ्लॅट दाखविला होता. या फ्लॅटचे बांधकाम होते, मात्र तो फ्लॅट आवडल्याने त्यांनी तिथे भाड्याने राहण्याचा निर्णय घेतला होता. चर्चेअंती त्यांच्यात अकरा लाखांच्या हेव्ही डिपॉझिटवर फ्लॅट देण्याचे ठरले होते. त्यानंतर त्यांच्यात एक करार झाला होता. ठरल्याप्रमाणे ऑक्टोंबर २०२२ रोजी त्यांनी फरहा हसीनला साडेदहा लाख रुपये दिले होते. यावेळी तिने बांधकाम पूर्ण झाल्यानंतर फ्लॅटचा ताबा देण्याचे आश्वासन दिले होते.
डिसेंबर २०२२ रोजी त्यांनी तिच्याकडे फ्लॅटचा ताबा देण्याबाबत विचारणा केली असता ती त्यांना आज-उद्या करुन टाळत होती. वेगवेगळे कारण सांगून त्यांना टाळण्याचा प्रयत्न करत होती. काही दिवसांनी तिने त्यांचे कॉल घेणे बंद केले होते. २४ डिसेंबर २०२२ रोजी तिने त्यांना कॉल करुन फ्लॅटचे काम बाकी असल्याचे सांगून त्यांच्याकडे आणखीन पैशांची मागणी केली होती. त्यानंतर एका आठवड्यात फ्लॅटचा ताबा देते असे सांगितले होते. त्यामुळे त्यांनी तिला ५० हजार रुपये दिले होते. एक आठवडा उलटूनही तिने फ्लॅटचा ताबा दिला नाही. त्यामुळे त्यांनी तिच्यासोबत झालेला फ्लॅटचा करार रद्द करुन त्यांच्या पैशांची मागणी सुरु केली होती. यावेळी तिने त्यांना पाच लाखांचा एक धनादेश दिला होता, मात्र हा धनादेश बँकेत न वटता परत आला होता.
फरहा हसीनने हेव्ही डिपॉझिटवर फ्लॅट देते सांगून छोटेलाल गुप्ता यांच्याकडून अकरा लाख रुपये घेतले, मात्र दिलेल्या मुदतीत फ्लॅटचा ताबा दिला नाही किंवा फ्लॅटसाठी घेतलेले अकरा लाख रुपये दिले नाही. तिच्याकडून फसवणुक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी मालवणी पोलिसांत घडलेला प्रकार सांगून तिच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर फरहा हसीनविरुद्ध पोलिसांनी अकरा लाखांचा अपहार करुन एका वयोवृद्धाची फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून तिची पोलिसांकडून लवकरच चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे.