हेव्ही डिपॉझिटच्या अठरा लाखांचा अपहार करुन फसवणुक

फ्लॅटमालक पती-पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
21 मे 2025
मुंबई, – हेव्ही डिपॉझिटच्या अठरा लाखांचा अपहार करुन एका व्यक्तीची सुमारे अठरा लाखांची फसवणुक झाल्याचा प्रकार भांडुप परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी फ्लॅटमालक असलेल्या पती-पत्नीविरुद्ध भांडुप पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. ब्रिजनाथ यादव आणि सरोज ब्रिजनाथ यादव अशी या आरोपी पती-पत्नीची नावे आहेत. तीन वर्षांचा हेव्ही डिपॉझिटचा करार करुनही या दोघांनी अडीच महिने उलटूनही फ्लॅटचा ताबा न देता तक्रारदाराविरुद्धच दिवाणी कोर्टात याचिका दाखल केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

34 वर्षांचा मेहुल महेंद्रप्रताप सिंग हा त्याच्या पत्नीसोबत भांडुप परिसरात राहतो. एका खाजगी कंपनीत तो कामाला असून त्याचा भाऊ सध्या दिल्लीतील नोएडा परिसरात राहतो. तो दिल्लीतून मुंबईत स्थायिक होणार होता. त्यामुळे मेहुल त्याच्या भावासाठी हेव्ही डिपॉझिटवर फ्लॅटची पाहणी करत होता. मात्र त्याला मनासारखा फ्लॅट मिळाला नव्हता. याच दरम्यान त्याच्या एका मित्राने त्याची ओळख ब्रिजनाथ यादवशी करुन दिली होती. ब्रिजनाथचा भांडुपच्या मंगतराम पेट्रोलपंपाजवळील मॅग्नेट मॉल, नेपच्युन इमारतीमध्ये एक फ्लॅट होता. त्याला तो फ्लॅट हेव्ही डिपॉझिटवर द्यायचा होता. त्यामुळे मेहुलने ब्रिजनाथच्या संबंधित फ्लॅटची पाहणी करुन तो फ्लॅट हेव्ही डिपॉझिटवर घेण्याचा निर्णय घेतला होता.

चर्चेनंतर त्यांच्यात तीन वर्षांसाठी अठरा लाखांच्या हेव्ही डिपॉझिटवर फ्लॅट भाड्याने देण्याचे ठरले होते. ठरल्याप्रमाणे जानेवारी 2025 रोजी त्याने ब्रिजनाथ व त्याची पत्नी सरोज या दोघांना टप्याटप्याने अठरा लाख रुपये ऑनलाईन ट्रान्स्फर केले होते. त्यानंतर त्यांच्यात तीन वर्षांसाठी फ्लॅट हेव्ही डिपॉझिटवर भाड्याने देण्याचा एक करार करण्यात आला होता. त्याची मुदत 1 मार्च 2025 ते 29 फेब्रुवारी 2028 अशी होती. त्यामुळे मेहुलने त्यांना 1 मार्चपर्यंत फ्लॅटचा ताबा देण्याची विनंती केली होती.

मात्र अडीच महिने उलटूनही यादव पती-पत्नीने फ्लॅटचा ताबा दिला नाही. वारंवार विचारणा करुनही त्यांनी फ्लॅटचा ताबा दिला नव्हता. त्यामुळे त्यांनी त्यांच्यातील व्यवहार रद्द करुन त्यांच्या अठरा लाखांची मागणी सुरु केली होती. मात्र या दोघांनी अठरा लाख रुपये परत केले नाही. उलट त्यांच्यावर दिवाणी कोर्टात याचिका सादर करुन आता कोर्टात बाजू मांडा अशी धमकी दिली होती. इतकेच नव्हे तर पैसे देणार नाही असे सांगून त्यांनी त्याला शिवीगाळ करुन पोलिसांत खोटी तक्रार करण्याची धमकी दिली होती.

या धमकीनंतर मेहुल सिंग यांनी भांडुप पोलिसांना घडलेला प्रकार सांगून ब्रिजनाथ आणि त्याची पत्नी सरोज यादव यांच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर या दोन्ही पती-पत्नीविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून या दोघांची लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page