मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
16 नोव्हेंबर 2025
मुंबई, – अकरा महिन्यांच्या भाड्याने दिलेला रुम भाडेकरुने दुसर्याला पंधरा लाख रुपयांच्या हेव्ही डिपॉझिटवर देऊन 62 वर्षांच्या वयोवृद्ध महिलेची फसवणुक केल्याचा धक्कादायक प्रकार वरळी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी दोन्ही भाडेकरुसह हेव्ही डिपॉझिटवर रुम घेणार्या व्यक्ती अशा तिन्ही भामट्याविरुद्ध ताडदेव पोलिसांनी बोगस दस्तावेज बनवून फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. इम्रान अन्वर खान, इरफान अहमद शेख आणि मोहम्मद इरफान गुलाम दस्तगीर कुरेशी अशी या तिघांची नावे असून या तिघांची पोलिसांकडून लवकरच चौकशी होणार आहे.
तक्रारदार वयोवृद्ध महिला प्रतिभा चंद्रकांत रुके ही वरळीतील ए. बी रोड, लोटस, परिसरात राहते. अकरा वर्षांपूर्वी तिने व्ही. पी नगर परिसरातील एक झोपडी श्रीनाथ रामावतार संतोषी आणि माया श्रीनाथ संतोषी यांच्याकडून विकत घेतली होती. या झोपडीच्या जागेवर नंतर एसआरएची एक इमारत बांधण्यात आली होती. तीन वर्षांपूर्वी तिला याच इमारतीच्या बाराव्या मजल्यावरील फ्लॅट 1204 अलोट झाला होता. गेल्या काही दिवसांपासून ती आजारी असल्याने तिने ती रुम भाड्याने देण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी इम्रान खान या चालकाने तिच्याकडून तिची रुम अकरा महिन्यांच्या भाडेतत्त्वावर घेण्याचा निर्णय घेतला होता.
दरमाह 24 हजारप्रमाणे त्याने तिला एकाच वेळेस अकरा महिन्यांचे 2 लाख 64 हजार रुपये दिले होते. याबाबत तिचे इम्रानसोबत एक करार झाला होता. या संपूर्ण इरफान हा इम्रानसोबत होता. या भाडे कराराची मुदत जून 2025 रोजी पूर्ण होत असल्याने 15 जूनला ती तिच्या सूनेसोबत तिथे गेली होती. यावेळी तिला तिथे इम्रान, इरफान राहत नसल्याचे दिसून आले. तिच्या रुममध्ये मोहम्मद इरफान कुरेशी नावाचा व्यक्ती त्याच्या कुटुंबियांसोबत राहत होता.
चौकशीअंती तिला तो रुम इम्रान आणि इरफानने दोन वर्षांसाठी पंधरा लाख रुपयांच्या हेव्ही डिपॉझिटवर दिल्याचे समजले. यावेळी या दोघांनी त्याला ती रुम त्यांच्या मालकीची असल्याचे सांगून त्यांना हेव्ही डिपॉझिटचे करारपत्र दाखविले होते. हा प्रकार पाहिल्यांनतर त्यांना धक्काच बसला होता. त्यानंतर तिने त्याला ती रुम तिच्या मालकीची असून तिने इरफान आणि इम्रानला अकरा महिन्यांच्या भाड्याने दिल्याचे सांगितले. तसेच त्याला रुम खाली करण्यास सांगितले.
मात्र त्याने रुम खाली करण्यास नकार दिला होता. या घटनेनंतर प्रतिभा रुके यांनी घडलेला प्रकार ताडदेव पोलिसांना सांगून तिन्ही आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची पोलिसांनी गंभीर दखल घेत तिन्ही आरोपीविरुद्ध बोगस दस्तावेज बनवून हेव्ही डिपॉझिटवर रुम देऊन तक्रारदार महिलेची फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.
या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. यातील इम्रान आणि इरफान हे सराईत गुन्हेगार असून त्यांनी अशाच प्रकारे इतर काही फसवणुकीचे गुन्हे केल्याचे बोलले जाते. त्याचा आता पोलीस तपास करत असल्याचे एका अधिकार्याने बोलताना सांगितले.