मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
19 डिसेंबर 2025
मुंबई, – हेव्ही डिपॉझिटवर घेतलेला रुम त्रयस्थ व्यक्तीला भाडेतत्त्वावर देऊन मासिक भाडे उत्पन्न स्वरुपात मिळवून देण्याचे आमिष दाखवून दोन महिलांसह तिघांची पाचजणांच्या एका टोळीने सुमारे 22 लाखांची फसवणुक केल्याची घटना वरळी परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी पाचही आरोपीविरुद्ध ताडदेव पोलिसांनी बोगस दस्तावेज बनवून हेव्ही डिपॉझिटसाठी घेतलेल्या पैशांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. इरफान अहमद शेख, इरफान गुलाम दस्तगीर कुरेशी, फिरोज मुर्तझा शेख, इम्रान अन्वर खान आणि सरवर अन्वर खान अशी या पाचजणांची नावे आहेत. या आरोपींनी रुमचा मालकी स्वतकडे असल्याची बतावणी करुन रुमचे बोगस दस्तावेज बनवून ही फसवणुक केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
अबिदा अजीत शेख ही 55 वर्षांची महिला वरळी परिसरात राहते. पाच वर्षांपूर्वी तिने इस्टेट एजंट इरफान कुरेशी आणि इरफान शेख यांच्याकडून भाड्याने एक रुम घेतली होती. तेव्हपासून ती दोघांना ओळखते. काही महिन्यानंतर ते दोघेही तिला भेटले होते. त्यांनी तिला वरळीतील लोटस, व्ही. पी नगर परिसरात हेव्ही डिपॉझिटवर रुम देण्याचे आश्वासन दिले होते. ही रक्कम तिने त्रयस्थ व्यक्तीला जास्त भाड्याने देऊन तिला काही रक्कम देण्याचे आमिष दाखविले होते. ही माहिती तिने तिच्या बहिणीला सांगितली. ही योजना चांगली वाटल्याने तयांनी म्हाडाचा रुम हेव्ही डिपॉझिटवर घेण्याचा निर्णय घेतला होता.
ठरल्याप्रमाणे तिने लोटस कॉलनीतील बी विंगमधील 402 क्रमांकाचा तर तिच्या बहिणीने व्ही. पी नगर, लोटस, एनएससीआय इमारतीमधील 201 क्रमांकाचा रुम हेव्ही डिपॉझिटवर घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी त्यांनी त्यांना 16 लाख 50 हजार रुपये दिले होते. ठरल्याप्रमाणे ते दोघेही त्यांना दरमाह सोळा हजार रुपये भाडे आणून देत होते. अशाच प्रकारे त्यांनी त्यांना अन्य एक रुम दाखवून त्यांना ती रुम हेव्ही डिपॉझिटवर घेऊन जास्त फायदा मिळविण्यासाठी प्रवृत्त केले होते. त्यासाठी तिने ती रुम साडेपाच लाखांच्या हेव्ही डिपॉझिटवर घेतली होती. या रुमसाठी त्यांच्याकडून त्यांना दरमाह 32 हजार रुपयांचे भाडे मिळत होते. त्यामुळे त्यांनी ते रुम कोणालाही भाडेकरु म्हणून राहण्यासाठी दिले आहेत याबाबत चौकशी केली नव्हती.
नोव्हेंबर 2024 पासून त्यांनी भाड्याची रक्कम देणे बंद केले होते. याबाबत विचारणा केल्यानंतर त्यांनी भाडेकरार संपला असून त्यांचे हेव्ही डिपॉझिटची रक्कम लवकरच देण्याचे आश्वासन दिले, मात्र ठरलेल्या वेळेस त्यांनी हेव्ही डिपॉझिट म्हणून घेतलेली 22 लाख रुपयांची रक्कम परत केली नाही किंवा रुमचा ताबा दिला नाही. चौकशीदरम्यान इरफान शेख आणि इरफान कुरेशी यांनी त्यांचे इतर तीन सहकारी फिरोज शेख, इम्रान खान आणि सरवर खान यांच्या मदतीने अनेकांना हेव्ही डिपॉझिटवर रुम देतो असे सांगून त्यांच्याकडे पैसे घेतले.
त्यांना ठराविक महिने भाड्याची रक्कम दिली आणि नंतर भाडे देणे बंद केले होते. हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी ताडदेव पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर इरफान शेख, इरफान कुरेशी, फिरोज शेख, इम्रान खान आणि सरवर खान या पाचजणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.