गिरणी कामगाराचा फ्लॅट हेव्ही डिपॉझिटवर देण्याच्या नावाने फसवणुक
वरळीतील घटना; इस्टेट एजंटविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२६ मार्च २०२४
मुंबई, – गिरणी कामगारांना देण्यात आलेला फ्लॅट हेव्ही डिपॉझिटवर देण्याचा बहाणा करुन एका व्यक्तीची सुमारे पंधरा लाखांची फसवणुक झाल्याचा प्रकार वरळी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी रतन वजाराम राव या इस्टेट एजंटविरुद्ध वरळी पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे.
सुशांत बाळकृष्ण मोरे हे वरळीतील कस्तुरबा गांधीनगर, परळ लोकसेवा सहकारी सोसायटीमध्ये राहत असून ते वांद्रे येथील डायमंड कंपनीत कामाला आहेत. भाड्याने राहत असल्याने त्यांना हेव्ही डिपॉझिटवर काही वर्षांसाठी फ्लॅटची गरज होती. त्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु होते. याच दरम्यान त्यांच्या पत्नीच्या एका मैत्रिणीने त्यांना नोव्हेंबर २०२१ रोजी इस्टेट एजंट रतन रावशी ओळख करुन दिली होती. रतन हा वरळी येथे राहत असून तिथेच त्याचे एक कार्यालय होते. त्यामुळे त्याची भेट घेऊन त्यांनी त्याला काही वर्षांसाठी हेव्ही डिपॉझिटवर फ्लॅट देण्याची विनंती केली होती. यावेळी त्याने गिरणी कामगारासाठी असलेल्या वरळी येथील श्रीराम मिल नाका, भारत मिल इमारतीमध्ये हेव्ही डिपॉझिटवर फ्लॅट देण्याचे मान्य केले होते. त्यानंतर त्याने त्यांना भारत मिल इमारतीजवळ बोलाविले होते. मात्र फ्लॅट न दाखविता त्याने इमारतीच्या दहाव्या मजल्यावर एक फ्लॅट असल्याचे सांगितले होते. फ्लॅटचे मालक वयोवृद्ध असल्याने ते तिथे येऊ शकत नाही. त्यामुळे त्यांनी त्याच्यावर फ्लॅट भाड्याने देण्याची जबाबदारी सोपविली आहे असे सांगितले. त्याच्यावर विश्वास ठेवून सुशांत मोरे यांनी रतन रावला १० नोव्हेंबर ते ८ डिसेंबर २०२१ या कालावधीत सुमारे पंधरा लाख रुपये हेव्ही डिपॉझिट म्हणून दिले होते. मात्र दिलेल्या मुदतीत त्याने फ्लॅटचा करार किंवा फ्लॅटचा ताबा दिला नाही. फ्लॅट मालकाशी बोलणे करुन दिले नाही. विचारणा केल्यानंतर तो सतत त्यांना विविध कारण सांगून टाळण्याचा प्रयत्न करत होता.
फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच त्यांनी त्याच्याकडे हेव्ही डिपॉझिटची दिलेल्या पैशांची मागणी सुरु केली होती. मात्र त्याने पैसे परत केले नाही. त्यामुळे त्यांनी वरळी पोलिसांना घडलेला प्रकार सांगून तिथे रतन रावविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध हेव्ही डिपॉझिटचा अपहार करुन तक्रारदाराची फसवणुक केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. रतनने अशाच प्रकारे हेव्ही डिपॉझिटच्या नावाने गिरणी कामगाराच्या फ्लॅटमध्ये भाडेकरु ठेवण्याचा बहाणा करुन इतर काही लोकांची फसवणुक केली आहे का याचा पोलीस तपास करत आहेत.