एकाच फ्लॅटसाठी पाचजणांकडून घेतलेल्या हेव्ही डिपॉझिटचा अपहार
तीस लाखांच्या फसवणुकीप्रकरणी पती-पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
20 ऑक्टोंबर 2025
मुंबई, – फ्लॅटचे मालक असल्याची बतावणी करुन हेव्ही डिपॉझिटवर फ्लॅट देण्याचे आमिष दाखवून एका जोडप्याने एक-दोन नव्हे तर पाचजणांकडून घेतलेल्या तीस लाख पन्नास हजार रुपयांचा अपहार करुन फसवणुक केल्याचा धक्कादायक प्रकार कुर्ला परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी आरोपी पती-पत्नीविरुद्ध विनोबा भावे नगर पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. नसरीन नूरमोहम्मद शेख ऊर्फ प्रिया अरुण भारसकळे आणि अरुण कृष्णाजी भारसकळे अशी या दोघांची नावे आहेत. या दोघांनी अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केल्याचे बोलले जाते.
मोहम्मद इरफान अब्दुल रशीद अन्सारी हे 56 वर्षाचे तक्रारदार इलेक्ट्रीशियन असून ते कुर्ला परिसरात राहतात. ते त्यांच्या कुटुंबियांसोबत पूर्वी वांद्रे येथील भारतनगर व पीएमजीपी कॉलनी परिसरात राहत होते. या ठिकाणाचे त्यांच्या मालकीचे तिन्ही घर पुर्नविकासासाठी गेले होते. त्यामुळे त्यांना हेव्ही डिपॉझिटवर फ्लॅटची गरज होती. याच दरम्यान त्यांची नसरीन शेखशी ओळख झाली होती. त्यांनी कुर्ला येथील एचडीआयएल कंपाऊंड, इमारत क्रमांक सहा, ए विंगचा रुम क्रमांक तीन तिच्यासह तिचा पती अरुण भारसकळे यांच्या मालकीचा असल्याचे सांगितले. त्यांना साडेअकरा लाखांच्या हेव्ही डिपॉझिटवर फ्लॅट देण्याचे मान्य केले होते.
याच फ्लॅटमध्ये राहत असताना त्यांच्या घरी शायना इम्रान खान ही महिला आली होती. तिने तो फ्लॅट तिच्या मालकीचा असून त्यांना तो फ्लॅट कोणी आणि कधी हेव्ही डिपॉझिटवर दिला याबाबत विचारणा केली. यावेळी त्यांनी घडलेला प्रकार सांगून फ्लॅटचा व्यवहार नसरीन शेखशी केल्याचे सांगितले. यावेळी शायनाने तिचा फ्लॅटशी काहीही संबंध नसून त्यांना तिथे राहायचे असेल तर तिला दरमाह आठ हजार रुपये भाडे द्यावे लागेल असे सांगितले. त्यामुळे त्यांनी तिला भाडे देण्याचे मान्य केले होते. ते भाडे नसरीनने त्याला देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र जुलै महिन्यांपासून तिने त्याला भाडे देणे बंद केले होते.
नसरीन आणि तिचा पती अरुण भारसकळे यांना संपर्क साधल्यानंतर या दोघांचे मोबाईल बंद येत होते. हा संपूर्ण प्रकार संशयास्पद वाटताच त्याने या दोघांविषयी चौकशी सुरु केली होती. चौकशीत कुर्ला परिसरात त्यांच्या मालकीचे फ्लॅट नाही, तरीही त्यांना दुसर्या व्यक्तीच्या नावावर असलेले फ्लॅट हेव्ही डिपॉझिटवर देऊन त्यांची फसवणुक केली होती. मोहम्मद इरफान यांच्याकडून त्यांनी हेव्ही डिपॉझिट म्हणून साडेअकरा लाख रुपये घेतले होते.
अशाच प्रकारे त्यांनी सलमान मोहम्मद अहमद खान व यास्मिन युसूफ खान यांच्याकडून प्रत्येकी पाच, अंजुम खालिद खानकडून सहा लाख तर सायराबानो इस्तेकार शेख यांच्याकडून तीन लाख असे 30 लाख 50 हजार रुपये घेतले होते. मात्र कोणालाही हेव्ही डिपॉझिटची रक्कम परत केली नव्हती. 2021 ते 2025 या कालावधीत या पाचजणांकडून घेतलेल्या पैशांचा अपहार करुन नसरीनसह तिचा पती अरुण भारसकळे यांनी फसवणुक केली होती.
हा प्रकार उघडकीस येताच मोहम्मद इरफान यांनी घडलेला प्रकार विनोबा भावे नगर पोलिसांना सांगितला. त्यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी दोन्ही आरोपी पती-पत्नीविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.