हेव्ही डिपॉझिटचा अपहार करुन दोन भाडेकरुंची फसवणुक
71 लाखांच्या फसवणुकीप्रकरणी पिता-पूत्राविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
28 डिसेंबर 2025
मुंबई, – हेव्ही डिपॉझिटच्या सुमारे 71 लाख रुपयांचा अपहार करुन दोन भाडेकरुंची फसवणुक झाल्याची घटना गोरेगाव परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी फ्लॅट मालक असलेल्या पिता-पूत्रांविरुद्ध गोरेगाव पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. वृषभ अनिल मिस्त्री आणि अनिल मिस्त्री अशी या दोघांची नावे आहेत. ते दोघेही पळून गेल्याने त्यांचा पोलिसाकडून शोध सुरु आहे. फ्लॅट हेव्ही डिपॉझिटवर देण्यापूर्वी या दोघांनी एका खाजगी बँकेतून कर्ज घेतले होते, कर्जाचे हप्ते न भरता बँकेसह दोन्ही भाडेकरुंच्या हेव्ही डिपॉझिटचा अपहार करुन फसवणुक केल्याचा दोन्ही पिता-पूत्रांवर आरोप असल्याचे पोलिसांनी सांगितले.
अनिल दिपक सोनकर हे इंजिनिअर असून सध्या गोरेगाव परिसरात त्यांच्या कुटुंबियांसोबत राहतात. ते सध्या एका खाजगी कंपनीत संगणक इंजिनिअर म्हणून कामाला आहेत. एप्रिल 2024 रोजी त्यांची त्यांना भाड्याने एका फ्लॅटची गरज होती. याच दरम्यान त्यांची एका ब्रोकरच्या मार्फत वृषभ मिस्त्रीशी ओळख झाली होती. त्याच्या मालकीचे गोरेगाव येथील लिंक व्हिव, सेठीया अपार्टमेंटमध्ये 401 क्रमांकाचा फ्लॅट होता. हा फ्लॅट त्यांना हेव्ही डिपॉझिटवर द्यायचा असल्याने त्यांनी या फ्लॅटची पाहणी केली. फ्लॅट पसंद पडल्याने त्यांनी तो फ्लॅट हेव्ही डिपॉझिटवर भाड्याने घेण्याचा निर्णय घेतला होता.
वृषभशी सविस्तर चर्चा केल्यानंतर त्यांच्यात 32 लाखांच्या हेव्ही डिपॉझिटवर फ्लॅट देण्याचे ठरले होते. त्यामुळे अनिल सोनकर यांनी त्याला ऑनलाईन 32 लाख रुपये ट्रान्स्फर केले होते. 24 एप्रिल 2024 रोजी फ्लॅटचा ताबा मिळाल्यानंतर ते त्यांच्या कुटुंबियांसोबत तिथे शिफ्ट झाले होते. त्यांच्याच शेजारी फ्लॅट क्रमांक 402 हादेखील मिस्त्री कुटुंबियांच्या मालकीचा असून तो त्यांनी मार्टीन जोसेफ यांना 29 जून 2024 पासून भाड्याने दिला होता. त्यासाठी मार्टीनने त्यांना 39 लाख रुपये हेव्ही डिपॉझिट म्हणून दिले होते. या दोन्ही फ्लॅटचे मेंटेनन्स आणि मालमत्ता कर भरण्याची संपूर्ण जबाबदारी मिस्त्री कुटुंबियांवर होती, मात्र त्यांनी ते भरले नव्हते. याबाबत विचारणा करुनही त्यांनी त्यांना प्रतिसाद दिला नव्हता.
याच दरम्यान अनिल सोनकर आणि मार्टीन जोसेफ यांना मिस्त्री पिता-पूत्रांनी हेव्ही डिपॉझिटवर फ्लॅट देण्यापूर्वी एका खाजगी बँकेतून 2 कोटी 45 लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. मात्र ते दोघेही कर्जाचे हप्ते नियमित भरत नव्हते. त्यामुळे बँकेच्या कर्मचार्याकडून भाडेकरु म्हणून राहत असलेल्या अनिल सोनकर आणि मार्टीन जोसेफ यांना विचारणा होत होती. कर्जाचे हप्ते भरत नसल्याने त्यांना फेब्रुवारी महिन्यांत पहिली, जुलै महिन्यांत दुसरी आणि नोव्हेंबर महिन्यांत तिसरा नोटीस बँकेने पाठविली होती.
मात्र या तिन्ही नोटीसची माहिती सांगूनही मिस्त्री पिता-पूत्रांनी बँकेला उत्तर दिले नाही किंवा बँकेच्या कर्जाचे हप्ते भरले नव्हते. या दोन्ही फ्लॅटवर जप्तीची कारवाई होण्याची शक्यता होती. त्यामुळे या दोघांनी मिस्त्री पिता-पूत्रांना ही माहिती देऊन बँकेचे प्रकरण मिटविण्याची विनंती केली, मात्र त्यांनी त्यांना प्रतिसाद दिला नाही, काही दिवसांनी दोघांचेही मोबाईल क्रमांक ब्लॉक केले होते. बँकेने पाठविलेल्या तिन्ही नोटीसला त्यांनी उत्तर दिले नाही म्हणून बँकेने मार्च 2025 रोजी दोन्ही भाडेकरुंना फ्लॅट खाली करण्याची नोटीस पाठविली होती.
इतकेच नव्हे तर बँकेने कोर्टाकडून साठ दिवसांत फ्लॅट खाली करण्याची नोटीस दोन्ही भाडेकरुंना दिली होती. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी मिस्त्री पिता-पूत्रांना संपर्क साधून त्यांच्या हेव्ही डिपॉझिटची मागणी सुरु केली होती. मात्र त्यांच्याकडून त्यांना काहीच प्रतिसाद मिळाला नाही. या दोघांनी बँकेत तारण ठेवलेले दोन्ही फ्लॅट हेव्ही डिपॉझिटवर देऊन, बॅकेचे नियमित कर्ज न भरता बँकेच्या कर्जासह दोन्ही भाडेकरुकडून घेतलेल्या सुमारे 71 लाख रुपयांच्या हेव्ही डिपॉझिटचा अपहार करुन फसवणुक केली होती.
हा प्रकार लक्षात येताच अनिल सोनकर यांनी गोरेगाव पोलीस ठाण्यात आरोपी पिता-पूत्राविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर वृषभ मिस्त्री आणि अनिल मिस्त्री यांच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून पळून गेलेल्या दोन्ही आरोपींचा शोध सुरु आहे.