मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
27 जुलै 2025
मुंबई, – एकाच फ्लॅटसाठी हेव्ही डिपॉझिटचा करार करुन चौदाजणांची सुमारे 55 लाखांची फसवणुक झाल्याचा प्रकार वडाळा परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी बोगस करार बनविणार्या वकिलासह तीन फ्लॅट मालक अशा चौघांविरुद्ध वडाळा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. निलेश बनसोडे, बाबासाहेब बनसोडे, छबू बनसोडे आणि वकिल गुप्ता अशी या चौघांची नावे आहेत. या गुन्ह्यांत चारही आरोपींना पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्यांची पोलिसांकडून लवकरच चौकशी होणार आहे. या चौकशीनंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
तौफील अब्दुल रजाक सोलकर हा तरुण वडाळ्यातील कोरबा मिठागर, महात्मा फुले वाडीचा रहिवाशी असून त्याचा डीटीपीचा व्यवसाय आहे. त्याला भाड्याने एका फ्लॅटची गरज होती, त्यासाठी त्याचे प्रयत्न सुरु होते. गेल्या वर्षी जून महिन्यांत त्याची त्यांनी बनसोडे कुटुंबियांशी ओळख झाली होती. यावेळी त्यांनी त्यांच्या मालकीचा एक फ्लॅट असून तो फ्लॅट त्यांना हेव्ही डिपॉझिटवर द्यायचा आहे असे सांगितले होते. फ्लॅटची पाहणी केल्यानंतर त्याने तोच फ्लॅट हेव्ही डिपॉझिटवर घेण्याचा निर्णय घेतला होता.
चर्चेअंती त्यांच्यात हेव्ही डिपॉझिटची रक्कम नक्की झाली होती. ठरल्याप्रमाणे त्याने त्यांना हेव्ही डिपॉझिटची रक्कम दिली होती. त्यानंतर वकिल गुप्ता याने त्यांच्यात फ्लॅट भाड्याने देण्याबाबत एक करार ककेला होता. या कराराची कायदेशीर नोटरी करण्यात आल होती. ठरल्याप्रमाणे तौफिल सोलकर हे तिथे राहण्यासाठी गेले होते. तिथे वास्तव्यास असताना त्यांना बनसोडे कुटुंबियांनी त्याच्यासह इतर चौदाजणांसोबत तोच फ्लॅट हेव्ही डिपॉझिट देण्याबाबत बोलणी करुन त्यांच्याशी भाडे करार करुन या कराराची नोटरी केली होती.
हेव्ही डिपॉझिट म्हणून संबंधित चौदाजणांकडून त्यांनी 55 लाख 43 हजार रुपये घेतले होते. मात्र त्यापैकी कोणालाही फ्लॅटचा ताबा किंवा हेव्ही डिपॉझिटसाठी घेतलेली रक्कम परत केली नव्हती. फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस येताच तौफिल सोलकर याने वडाळा पोलिसांना घडलेला प्रकार सांगून बनसोडे कुटुंबियासह त्यांचा वकिल मित्र गुप्ता यांच्याविरुद्ध तक्रार केली होती.
या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर या चौघांविरुद्ध बोगस दस्तावेज बनवून हेव्ही डिपॉझिटसाठी घेतलेल्या सुमारे 55 लाखांचा अपहार करुन चौदाजणांची फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून अद्याप कोणालाही अटक झाली नाही. चौकशीनंतर संबंधित दोषीवर योग्य ती कायदेशीर कारवाई होईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.