मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२० ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – हेव्ही डिपॉझिटचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी रियाज मोहम्मद इलियास शेख या ४९ वर्षांच्या रुममालकाला मालवणी पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. याच गुन्ह्यांत रियाजची पत्नी मिसबाह रियाज मोहम्मद शेख आणि महिला एजंट नसीमा या दोघांना सहआरोपी दाखविण्यात आले आहे. त्यांच्यावर लवकरच अटकेची कारवाई होणार आहे.
प्लंबर म्हणून काम करणारा तक्रारदार इरफान बालचंद शेख हा मालाडच्या मालवणी परिसरात राहतो. पूर्वी तो हनुमाननगर परिसरात राहत होता. ही रुम छोटी असल्याने त्याला त्याच्या कुटुंबियांसाठी मोठी रुम हवी होती. त्यामुळे तो मालवणी परिसरात रुमचा शोध घेत होात. ऑक्टोंबर महिन्यांत त्याची नसीमा या महिला एजंटशी ओहख झाली होती. ती हेव्ही डिपॉझिटवर मालवणी परिसरात रुम देण्याचे काम करत होती. त्यामुळे त्यांनी तिच्याकडे हेव्ही डिपॉझिटवर रुम पाहण्यास सांगितले होते. याच दरम्यान तिने त्यांची ओळख रियाज मोहम्मद शेखशी करुन दिली होती. त्याच्या मालकीचा मालवणीतील गेट क्रमांक पाचमध्ये एक रुम होता. तिने त्याला हाच रुम दोन लाखांच्या हेव्ही डिपॉझिटवर देण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे त्याने त्याच्या पत्नीसोबत रुमची पाहणी केली होती. चौकशीनंतर त्याला तो रुम रियाज मोहम्मद याच्याच मालकीचा असल्याचे समजले होते. त्यामुळे त्याने तो रुम हेव्ही डिपॉझिटवर घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर त्याने रियाज मोहम्मद, त्याची पत्नी मिसबाह यांना दोन लाख रुपये डिपॉझिट म्हणून दिले होते. हा संपूर्ण व्यवहार नसीमासमोरच झाला होता. पेमेंट दिल्यानंतर त्यांनी पंधरा दिवसांत रुमचा ताबा देण्याचे मान्य केले होते, मात्र एक महिना उलटूनही त्यांनी रुमचा ताबा दिला नाही.
चौकशीनंतर ते तिघेही त्याला टाळण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे त्याने त्यांच्याशी केलेला व्यवहार रद्द करुन त्यांच्याकडे हेव्ही डिपॉझिटसाठी दिलेल्या दोन लाखांची मागणी सुरु केली होती. मात्र त्यांनी पैसे दिले नाही. सतत पैशांची मागणी करत असल्याने मिसबाहने स्वतवर ब्लेडने हल्ला करुन गळफास घेऊन आत्महत्या करण्याची धमकी दिली. या तिघांकडून फसवणुक झाल्याचे लक्षात येताच इरफान शेख यांनी मालवणी पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर रियाज मोहम्मद, मिसबाह रियाज आणि नसीमा या तिघांविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच रियाज मोहम्मदला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत दोघांना पाहिजे आरोपी दाखविण्यात आले आहे. त्यांचा पोलिसाकडून शोध सुरु आहे.