मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२९ मे २०२४
मुंबई, – झारखंड येथून विक्रीसाठी आणलेल्या हेरॉईनसह दोन तरुणांना ऍण्टी नारकोटीक्स सेलच्या कांदिवली युनिटच्या अधिकार्यांनी एक कोटी बारा लाख रुपयांच्या हेरॉईनसह दोघांना कांदिवली युनिटच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने बोरिवलीतून अटक केली. खुदाबक्ष शहीद बक्ष आणि शाहबाज सत्तार अहमद अली अशी या दोघांची नावे असून त्यांच्याकडून पोलिसांनी १ कोटी १२ लाख रुपयांचे २८० ग्रॅम वजनाचे हेरॉईन जप्त केले आहेत. अटकेनंतर या दोघांनाही किल्ला कोर्टाने सोमवार ३ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
गेल्या काही वर्षांत इतर राज्यात ड्रग्ज आणून त्याची मुंबईत विक्री करणारी काही टोळ्या सक्रिय झाल्या होत्या. त्यामुळे अशा टोळीविरुद्ध मुंबई पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही मोहीम सुरु असताना झारखंड येथून काहीजण बोरिवली परिसरात हेरॉईन या ड्रग्जची डिलीव्हरीसाठी येणार असल्याची माहिती कांदिवली युनिटला मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त लखमी गौतम, अतिरिक्त पोलीस आयुक्त शशीकुमार मीना, पोलीस उपायुक्त शाम घुगे, सहाय्यक पोलीस आयुक्त किरण लोंढे, प्रभारी पोलीस निरीक्षक वैभव धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली कांदिवली युनिटच्या अधिकारी आणि कर्मचार्यांनी बोरिवली पूर्वेला साध्या वेशात पाळत ठेवली होती. मंगळवारी सायंकाळी तिथे खुदाबक्ष आणि शाहबाज हे दोन तरुण आले होते. या दोघांची हालचाल संशयास्पद वाटत होती, त्यामुळे त्यांना पळून जाण्याची कुठलीही संधी न देता या पथकाने शिताफीने ताब्यात घेतले. त्यांच्या अंगझडतीत पोलिसांना २८० ग्रॅम वजनाचे उच्च प्रतीचे हेरॉईन सापडले. त्याची किंमत १ कोटी १२ लाख रुपये इतकी आहे.
तपासात ते दोघेही झारखंडचे रहिवाशी असून झारखंड येथून ते हेरॉईन विक्रीसाठी मुंबईत आले होते. मात्र हा व्यवहार पूर्ण होण्यापूर्वीच या दोघांनाही पोलिसांनी अटक केली. त्यांच्याविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच गुन्ह्यांत बुधवारी दोघांनाही किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. या दोघांनाही हेरॉईन देणार्यांची नावे समोर आली असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.