हितेश मेहता याच्या लाय डिटेक्टर टेस्टसाठी कोर्टात अर्ज

टेस्टद्वारे आर्थिक गैरव्यवहाराची माहिती जाणून घेणार

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
28 फेब्रुवारी 2025
मुंबई, – प्रभादेवी आणि गोरेगाव येथून शाखेत काढलेल्या सुमारे 122 कोटीचा अपहार केल्याचा आरोप असलेला न्यू इंडिया सहकारी बँकेचा महाव्यवस्थापक हितेश प्रविणचंद्र मेहता याच्या लाय डिटेक्टर टेस्टसाठी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने किल्ला कोर्टात धाव घेतली असून शुक्रवारी त्यासाठी रितसर अर्ज करण्यात आला होता. कोर्टाकडून परवानगी प्राप्त होताच हितेशची लाय डिटेक्टर टेस्ट होणार असून या टेस्टद्वारे त्याच्या आर्थिक गैरव्यवहाराची माहिती जाणून घेण्याचा पोलीस प्रयत्न करणार आहे. गेल्या दोन दशकांत आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यांतील आरोपीची लाय डिटेक्टर टेस्ट होण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे बोलले जाते.

फेब्रुवारी महिन्यांत दुसर्‍या आठवड्यात न्यू इंडिया सहकारी बँकेत झालेल्या 122 कोटीच्या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी दादर पोलिसांनी गुन्हा नोंदवून त्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला होता. गुन्हा दाखल होताच बँकेचा महाव्यवस्थापक हितेश मेहता आणि बिल्डर धर्मेश जयंतीलाल पौन या दोघांनाही शनिवारी पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत ते दोघेही सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांच्या चौकशीतून उन्ननाथन अरुणाचलम ऊर्फ अरुणभाई याचे नाव समोर आले होते. पोलीस कोठडीत असताना हितेशने 122 कोटीपैकी सत्तर कोटी धर्मेश पौन तर चाळीस कोटी अरुणभाई याला दिल्याची कबुली दिली होती. धर्मेशचा कांदिवलीतील चारकोप परिसरात एक एसआरए प्रोजेक्ट सुरु असून याच प्रोजेक्टमध्ये गुंतवणुकीला त्याला हितेशने ही रक्कम दिली होती तर अरुणभाईला त्याच्या सोलर पॅनल व्यवसायासाठी पैसे देण्यात आले होते.

मात्र धर्मेशने हितेशकडून त्याला सत्तर कोटी मिळाले नसल्याचा दावा केला आहे. त्याच्याकडून त्याला दोन ते तीन कोटी रुपये मिळाले होते, ती रक्कम त्याने हितेशला पुन्हा दिल्याचे सांगितले. तपासात ते दोघेही वेगवेगळे दावे करत होते. रकमांचा आकडा बदलून सांगत असल्याने पोलीस गोंधळून गेले आहेत. हितेश हा खोटी माहिती सांगत असून पोलिसांची दिशाभूल करत आहे असा आरोपच धर्मेशने केला आहे. या आरोपानंतर हितेशची पोलिसांकडून लाय डिटेक्टर टेस्ट करण्याची तयारी सुरु केली होती. टेस्टसाठी आवश्यक असलेली सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर शुक्रवारी आर्थिक गुन्हे शाखेने किल्ला कोर्टात हितेशच्या लाय डिटेक्टर टेस्टसाठी अर्ज केला होता. आता कोर्टाच्या निर्णयाची पोलिसांना प्रतिक्षा आहे.

कोर्टाकडून परवानगी मिळाल्यास हितेशची लवकरच ही टेस्ट केली जााणार आहे. या टेस्टमध्ये त्याने हा घोटाळा कधी व कसा केला, याकामी त्याला कोणी मदत केली. त्याने पैशांची विल्हेवाट कशा प्रकारे लावली. त्याने कोणाला कधी, केव्हा आणि किती रुपये दिले याबाबत प्रश्न विचारली जाणार आहे. त्याच्या चौकशीनंतर काही गोष्टींचा खुलासा होणार आहे. दुसरीकडे याच गुन्ह्यांत उन्ननाथन अरुणाचलम याच्यासह बँकेचा माजी अध्यक्ष हिरेन भानू व त्याची पत्नी आणि बँकेच्या उपाध्यक्ष अशा तिघांना पाहिजे आरोपी दाखविण्यात आले आहे. उन्ननाथनच्या अटकेसाठी पोलिसांनी बक्षिसही जाहीर केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page