मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
12 मार्च 2025
मुंबई, – होळी-धुलिवंदननिमित्त मुंबई शहरात कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मुंबई पोलिसांनी सर्वत्र कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. त्यासाठी काही नियम जारी करण्यात आले असून या नियमांचे उल्लघंन करणार्या व्यक्तीविरुद्ध सक्त कारवाई करण्याचे आदेश वरिष्ठांकडून संबंधित पोलीस ठाण्यांना देण्यात आले आहे. मुंबई पोलिसांनी दिलेल्या नियमांचे पालन करुन होळी व धुलिवंदन आनंदाने आणि जल्लोषात साजरा करा असे आवाहन मुंबई पोलिसांकडून करण्यात आले आहे.
13 मार्चला होळी आणि 14 मार्चला धुलिवंदन असल्याने मुंबईकर मोठ्या प्रमाणात सार्वजनिक आणि खाजगी ठिकाणी होळ्या पेटवून, एकमेकांना रंग लावून हा सण साजरा करतात. त्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. या सणाला कुठेही गालबोट लागू नये तसेच अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी जय्यत तयारी केली आहे. शहरात सर्वत्र कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. होळी आणि धुलिवंदन हा सण सुरक्षितपणे आणि निर्विघ्नपणे साजरा करता यावा यासाठी संपूर्ण शहरात सात अतिरिक्त पोलीस आयुक्त, एकोणीस पोलीस उपायुक्त, 51 सहाय्यक पोलीस आयुक्त, 1767 पोलीस अधिकारी, 9145 पोलीस अंमलदार असा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्याचबरोबर महत्त्वाच्या ठिकाणी एसआरपीएफ प्लाटून, क्यूआरटी टिम, बीडीडीएस टिम, होमगार्डस आदींना मदतीसाठी ठेवण्यात आले आहे.
पोलीस दलातर्फे ठिकठिकाणी नाकाबंदीचे आयोजन करण्यात आले असून गर्दीच्या ठिकाणी गस्त आणि फिक्स पॉईट बंदोबस्त नेमण्यात आले आहे. वाहतूक नियमांचे उल्लघंन व ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह विरोधात विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. नियमभंग करणार्या आस्थापना आणि अभिलेखावरील गुन्हेगारांची तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. मद्यप्राशन करुन वाहन चालविणार्या, सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणार्या, महिलांशी गैरवर्तन करणार्या, अनधिकृतपणे मद्य विक्री करणार्या आस्थापना, ड्रग्ज सेवन आणि विक्री करणार्याविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार आहे. तरीही सर्व नागरिकांनी मुंबई पोलिसांनी दिलेल्या सर्व नियमांचे पालन करुन होळी आणि धुलिवंदन सण उत्साहाने आणि जल्लोषात साजरा करावा असे आवाहन मुंबई पोलिसांकडून करण्यात आला आहे.
होळी आणि धुलिवंदनदरम्यान काहीजण रंगीत पाणी शिंपडून, अश्लील संभाषण करत असल्याने अनेकदा जातीय तणाव आणि शांतता भंग होण्याची शक्यता असते. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी शांतता आणि सुरक्षितता राखण्यासाठी मुंबई पोलिसांकडून काही नियमावली जाहीर करण्यात आली आहे. पोलीस उपायुक्त अकबर पठाण यांनी याबाबत ही माहिती दिली. अश्लील संभाषणा किंवा घोषणांचे सार्वजनिक उच्चारण किंवा अश्लील गाणी गाऊ नये. हावभाव किंवा नक्कलेचा वापर, चित्रे, चिन्हे फलक आणि इतर कोणत्याही वस्तू कंवा गोष्टीचे, प्रदर्शन किंवा प्रसारण करणे ज्यामुळे कोणाचीही प्रतिष्ठा, सभ्यता किंवा नैतिकता दुखाविली जाणार नाही याची काळजी घ्यावी. पादचार्याांवर रंगीत पाणी, रंग किंवा पावडर फवारणे किंवा फेंकू नये. रंगीत किंवा साध्या पाण्याने किंवा कोणत्याही द्रव्याने भरलेले फुगे मारु किंवा फेंकू नये असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले. या नियमांचे तसेच आदेशाचे उल्लघन केल्यास त्यांच्यावर महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 135 नुसार कारवाई होणार आहे.