फ्लॅटचे बोगस दस्तावेज सादर करुन बँकेच्या गृहकर्जाचा अपहार

29 लाखांच्या फसणणुकीप्रकरणी जोडप्याविरुद्ध गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
24 डिसेंबर 2025
मुंबई, – फ्लॅटचे बोगस दस्तावेज सादर करुन बँकेकडून घेतलेल्या सुमारे 29 लाखांचा अपहार करुन एका जोडप्याने बँकेची फसवणुक केल्याची घटना लालबाग परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी आरोपी जोडप्याविरुद्ध काळाचौकी पोलिसांनी बोगस दस्तावेज सादर करुन गृहकर्जाच्या पैशांचा अपहार करुन बँकेची फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. सदानंद विश्वनाथ दरेकर आणि निलिमा सदानंद दरेकर अशी या दोघांची नावे आहेत. या दोघांनी याच फ्लॅटवर अन्य एका बँकेवर मॉर्गेज कर्ज घेऊन संबंधित बँकेची फसवणुक केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

बाळू चिंतू यादव हे एका खाजगी बँकेत मॅनेजर म्हणून काम करत असून सध्या त्यांची लालबाग येथील शाखेत नेमणूक आहे. अकरा वर्षांपूर्वी त्यांच्या बँकेत सदानंद दरेकर आणि निलिमा दरेकर यांनी गृहकर्जासाठी अर्ज केला होता. दरेकर हे वरळीतील गणपतराव राधव मार्ग, बीडीडी चाळीत राहत होते. 2016 साली त्यांनी नवी मुंबईतील नेरुळ, श्रीराम अपार्टमेंटमध्ये एक फ्लॅट बुक केला होता. याच फ्लॅटसाठी त्यांनी तीस लाखांच्या गृहकर्जासाठी अर्ज केला होता. त्यांच्या अर्जाची शहानिशा केल्यानंतर बँकेने त्यांच्या फ्लॅटचे व्हॅल्यूएशन केले होते. त्यात तो फ्लॅट 44 लाखाचा असल्याचा अहवाल देण्यात आला होता. त्यानंतर बॅकेने त्यांना तीस लाखांचे गृहकर्ज मंजूरीचे पत्र दिले होते. यावेळी त्यांना त्यांच्यासह फ्लॅटसंबंधित सर्व दस्तावेज सादर करण्यात सांगण्यात आले होते.

काही दिवसांनी सदानंद दरेकर आणि निलिमा दरेकर यांनी त्यांच्यासह फ्लॅटशी संबंधित सर्व मूळ कागदपत्रे बँकेत जमा केले होते. हा फ्लॅट त्यांनी नाताजी शंकर मोहिते यांच्याकडून खरेदी केला होता. त्यामुळे बँकेने गृहकर्जाचा पे ऑर्डर त्यांच्याच नावावर काढला होता. या कर्जानंतर या दोघांनी बँकेने दिलेले नियमित हप्ते भरले होते. मात्र एप्रिल 2016 पासून त्यांनी कर्जाचे हप्ते भरणे बंद केले होते. त्यामुळे बँकेच्या वतीने त्यांना टप्याटप्याने तीन लिगल नोटीस पाठविण्यात आली होती. मात्र ही नोटीस पाठवूनही त्यांच्याकडून बँकेला काहीच प्रतिसाद मिळाला नव्हता. त्यामुळे बँकेने संबंधित फ्लॅटवर जप्तीची कारवाईची प्रक्रिया सुरु केली होती. त्यासाठी बँकेचे एक विशेष पथक नवी मुंबईतील श्रीराम अपार्टमेंटमधील फ्लॅट क्रमांक 102 मध्ये गेले होते.

यावेळी या पथकाला तिथे आधीच एका बँकेची नोटीस लावण्यात आल्याचे दिसून आले. फ्लॅट लिलाव विक्रीची ती नोटीस होती. त्यामुळे बँकेने संबंधित बँकेशी संपर्क साधून त्याच्याकडून फ्लॅटविषयी माहिती काढण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी संबंधित बँकेने तो फ्लॅट गेल्या एक वर्षांपासून त्यांच्या ताब्यात आहे. सदानंद दरेकर आणि निलिमा दरेकर यांनी तो फ्लॅट त्यांच्या बँकेत मॉर्गेज ठेवून बँकेतून कर्ज घेतले होते. काही महिने कर्जाचे हप्ते भरल्यानंतर त्यांनी कर्जाचे हप्ते भरणे बंद केले होते. त्यामुळे बँकेने त्यांच्या नवी मुंबईतील फ्लॅटवर जप्तीची कारवाई केली होती. तशी नोटीस फ्लॅटवर लावण्यात आली होती.

या बँकेत फ्लॅटचे मूळ कागदपत्रे मॉर्गेज म्हणून ठेवल्यांनतर त्यांनी तक्रारदाराच्या बँकेत त्याच फ्लॅटचे बोगस दस्तावेज सादर केले होते. बोगस दस्तावेज सादर करुन त्यांनी बँकेतून गृहकर्ज प्राप्त केले होते. प्रॉपटीचे रजिस्ट्रेशन करताना आणि बँकेत सादर केलेल्या कागदपत्रांवर प्रचंड तफावत होते. अशा प्रकारे सदानंद दरेकर आणि निलिमा दरेकर यांनी गृहकर्ज घेताना बँकेत बोगस दस्तावेज सादर करुन त्यांनी दिलेल्या गृहकर्जाच्या 29 लाख 28 हजार 370 रुपयांचा अपहार करुन बँकेची फसवणुक केली होती. हा प्रकार निदर्शनास येताच बँकेच्या वतीने बाळू यादव यांनी काळाचौकी पोलिसांत तक्रार केली होती.

या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर या दोघांविरुद्ध पोलिसांनी बोगस दस्तावेज सादर करुन गृकर्जाचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु आहे. या दोघांनी अशाच प्रकारे बोगस दस्तावेज सादर करुन इतर काही बँकांची फसवणुक केली आहे का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page