गृहकर्जाच्या 2.72 कोटीचा अपहार करुन बँकेची फसवणुक

बोगस दस्तावेज सादर करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
14 जानेवारी 2026
मुंबई, – गृहकर्जाच्या 2 कोटी 72 लाख रुपयांचा अपहार करुन एका नामांकित बँकेची फसवणुक झाल्याचा प्रकार घाटकोपर परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी पाच कर्जदाराविरुद्ध बोगस दस्तावेज सादर करुन बँकेची फसवणुक केल्याप्रकरणी पंतनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. संदीप शिवराम यादव, बायका पांडुरंग बगाडी, दिपक तानाजी पवार, रेखा विजय जाधव आणि अमन इंद्रनाथ शर्मा अशी या पाचजणांची नावे आहेत. यातील रेखा जाधव यांचे निधन झाले असून उर्वरित चौघांची पोलिसांकडून लवकरच चौकशी होणार आहे. त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स पाठविले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

जोसेफ डेव्हीड नाडार हे अंधेरी परिसरात राहत असून घाटकोपर येथील एका नामांकित बँकेत मॅनेजर म्हणून काम करतात. जानेवारी 2020 ते 29 नोव्हेंबर 2022 या कालावधीत त्यांच्या बँकेने पाच कर्जदारांना 2 कोटी 72 लाख 14 हजार 726 रुपयांचे गृहकर्ज दिले होते. त्यात संदीप यादवने 65 लाख, बायका बगाडीने ठाण्यातील कोलशेत, हायलॅण्ड अपार्टमेंटच्या फ्लॅटसाठी 71 लाख 65 हजार 616 रुपये, दिपक पवार व रेखा जाधव यांनी डोबिवलीतील काटई टोलनाका, वर्सटाईल व्हॅली अपार्टमेंटच्या फ्लॅटसाठी अनुक्रमे 57 लाख 50 हजार व 57 लाख 34 हजार 153 तर अमन शर्माने डोंबिवलीतील मानपाडा, ग्रॅण्ट विस्टा अपार्टमेंटच्या फ्लॅटसाठी 27 लाख 84 हजार 181 रुपयांचे कर्ज घेतले होते. कर्जाचे काही हप्ते भरल्यानंतर त्यांनी गृहकर्जाचे हप्ते भरणे बंद केले होते.

हा प्रकार लक्षात येताच बँकेचे सेल्स विभागाचे केतन काबदुले, रत्नम पेरीबराय यांनी संबंधित कर्जधाकांची माहिती घेऊन चौकशी सुरु केली होती. या चौकशीदरम्यान बायका बगाडी, दिपक पवार, रेखा जाधव आणि अमर शर्मा हे त्यांनी दिलेल्या पत्त्यावर राहत नसल्याचे दिसून आले. त्यापैकी रेखा जाधव या मयत झाल्या आहेत. गृहकर्जासाठी त्यांनी मेसर्च आर प्रिंट आणि मेसर्च सॅविओ पॅकेजिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे संचालकासह कर्मचारी असल्याचे दस्तावेज सादर केले होते. मात्र या दोन्ही कंपनीची चौकशी केली असता ते तिथे संचालक तसेच कर्मचारी म्हणून काम नसल्याचे दिसून आले.

या पाचही आरोपींनी गृहकर्जासाठी अर्ज करताना बोगस दस्तावेज सादर केले होते. त्यांच्या कंपनीची खोटी माहिती दिली होती.  गृहकर्जाच्या 2 कोटी 72 लाखांचा परस्पर अपहार करुन बँकेची फसवणुक केली होती. हा प्रकार उघडकीस येताच बँकेने संदीप यादव वगळता इतर चारही फ्लॅटवर कारवाई करुन ते फ्लॅट सील केले होते. बँकेच्या सेल्स विभागाने त्यांचा अहवाल वरिष्ठांना सादर केला होता. त्यात पाचही आरोपींनी बँकेची फसवणुक करण्याच्या उद्देशाने कट रचून पैशांचा अपहार करुन फसवणुक केल्याचे नमूद करण्यात आले होते.

फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस येताच बँकेच्या वतीने जोसेफ नाडार यांनी पंतनगर पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर संदीप यादव, बायका बगाडी, दिपक पवार, रेखा जाधव आणि अमन शर्मा या पाचही आरोपीविरुद्ध पोलिसांनी बोगस दस्तावेज सादर करुन गृहकर्जाच्या 2 कोटी 72 लाखांचा अपहार करुन बँकेची फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा पोलिसांकडून तपास सुरु आहे. संबंधित चारही आरोपींची पोलिसांकडून लवकरच चौकशी होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page