हॉस्पिटल सेटअपच्या नावाने 1.15 कोटीची फसवणुक

फसणुकीप्रकरणी डॉक्टरसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
26 जुलै 2025
मुंबई, – हॉस्पिटल सेटअप करण्याच्या नावाने एका पती-पत्नीची तीनजणांच्या टोळीने एक कोटी पंधरा लाखांची फसवणुक केल्याचा प्रकार बोरिवली परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी एका डॉक्टरसह तिघांविरुद्ध कस्तुरबा मार्ग पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोदवून तपास सुरु केला आहे. डॉ. श्याम महानंद झा, अवधेशकुमार झा आणि शाहिद कापाडिया अशी या तिघांची नावे आहेत. या गुन्ह्यांत अद्याप कोणालाही अटक झाली नसून या तिघांची लवकरच पोलिसांकडून चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

लिना आशिष पाटील ही महिला बोरिवलीतील एस. व्ही रोड, कोरा केंद्र, सुमरेनगरात राहते. सात वर्षापूर्वी तिची डॉ. श्याम झा याच्याशी ओळख झाली होती. त्याने लिना व तिचे पती आशिष पाटील यांना हॉस्पिटलसाठी एक जागा खरेदी करुन हॉस्पिटलच्या सेटअपसाठी 60 कोटीची गरज असल्याचे सांगितले होते. त्यापैकी 45 कोटी जागेसाठी तर पंधरा कोटी हॉस्पिटल बांधणीसाठी येणार असल्याचे सांगितले होते. हॉस्पिटलसाठी त्याने त्यांच्याकडे गुंतवणुक करण्याची विनंती केली होती. जागा खरेदीसाठी त्यांनी दहा टक्के गुंतवणुक करावी, हॉस्पिटल सुरु झाल्यानंतर त्यांना चांगला शेअर आणि गुंतवणुक रक्कमेवर चांगला परतावा देण्याचे आश्वासन दिले होते.

या आमिषाला बळी पडून लिना पाटीलने 1 कोटी 4 लाख 50 हजार रुपये तर तिचे पती 11 लाख रुपयांची गुंतवणुक केली होती. हा संपूर्ण व्यवहार डॉ. श्याम झा, अवधेशकुमार झा आणि शाहिद कापाडिया यांच्यासमोरच झाला होता. या व्यवहारानंतर त्यांच्यात एक करार झाला होता. मात्र ही रक्कम घेतल्यानंतर त्यांनी हॉस्पिटलसाठी जागा घेतली नाही किंवा सेटअप केले नव्हते. लिना आणि आशिष पाटील यांनी दिलेल्या 1 कोटी 15 लाखांचा परस्पर अपहार करुन त्यांची फसवणुक केली होती. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी त्यांच्या गुंतवणुक रक्कमेची मागणी सुरु केली होती. मात्र वारंवार विचारणा करुनही त्यांनी त्यांना पैसे परत केले नाही.

हॉस्पिटल सेटअपच्या बहाण्याने या तिघांकडून फसवणुक झाल्याचे निदर्शनास येताच लिना व आशिष पाटील यांनी तिन्ही आरोपीविरुद्ध कस्तुरबा मार्ग पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर डॉ. श्याम झा, अवधेशकुमार झा आणि शाहिद कापाडिया या तिघांविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. याच गुन्ह्यांत तिघांनाही पाहिजे आरोपी दाखविण्यात आले आहे. त्यांची पोलिसांकडून लवकरच चौकशी होणार आहे. या चौकशीनंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई केली होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page