मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
३० जून २०२४
मुंबई, – आजारामुळे गौरव महेंद्र भोसले या ३८ वर्षांच्या रुग्णाने क्रांतीज्योती महात्मा ज्योतिबा फुले हॉस्पिटलमध्येच आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी विक्रोळी पोलिसांनी एडीआरची नोंद केली आहे. दारुच्या अतिसेवनामुळे गौरवला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. हॉस्पिटलमध्ये दारु पिता येत नसल्याने तो मानसिक तणावात होता. त्यातून आलेल्या मानसिक नैराश्यातून त्याने गळफास घेऊन जीवन संपविल्याचे बोलले जाते.
महेंद्र गणपत भोसले हे ६९ वर्षांचे वयोवृद्ध विक्रोळीतील टागोरनगर, ग्रुप क्रमांक तीन परिसरात राहत होते. गौरव हा त्यांचा मुलगा असून त्याला पंधरा वर्षांपासून दारु पिण्याचे व्यसन लागले होते. दारुचा अतिरेक झाल्याने त्याची प्रकृती बिघडली होती. त्यात दारु पिता येत नसल्याने तो काही दिवसांपासून मानसिक तणावात होता. त्यामुळे त्याला बुधवारी २६ जूनला त्याच्या वडिलांनी विक्रोळीतील क्रांतीज्योती महात्मा ज्योतिबा फुले हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तिथेच त्याच्यावर उपचार सुरु होते. हॉस्पिटलमध्ये दारु पिता येत नसल्याने तो आणखीन तणावात होता. त्यामुळे रविवारी सकाळी साडेपाच वाजता त्याने बाथरुममधील खिडकीला बेडशीटसारख्या कपड्याने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. हा प्रकार नंतर हॉस्पिटलच्या कर्मचार्यांच्या निदर्शनास येताच त्यांनी ही माहिती विक्रोळी पोलिसांना दिली होती. त्याला तपासल्यानंतर डॉक्टरांनी मृत घोषित केले. याप्रकरणी त्याचे वडिल महेंद्र भोसले, मावस भाऊ, हॉस्पिटलमधील नर्स, वार्डबॉय, वैद्यकीय अधिकारी आदींची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली आहे. त्याच्या वडिलांनी कोणावरही संशय व्यक्त केला नाही किंवा कोणाविरुद्ध तक्रार केली नव्हती. हॉस्पिटलमध्ये दारु पिता येत नसल्याने मानसिक नैराश्यातून गौरवने आत्महत्या केल्याचे त्यांनी त्यांच्या जबानीत म्हटले आहे. या जबानीनंतर विक्रोळी पोलिसांनी एडीआरची नोंद करुन गौरवचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला होता. शवविच्छेदनानंतर त्याचा मृतदेह त्याच्या वडिलांच्या स्वाधीन करण्यात आला आहे.