मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
1 नोव्हेंबर 2025
मुंबई, – हॉटेल बंद करताना सेफ लॉकरच्या कॅशवर डल्ला मारुन पळून गेलेल्या आरोपी कर्मचार्याला अखेर कांदिवली पोलिसांनी अटक केली. करणलाल हर्ष शर्मा असे या 35 वर्षांच्या आरोपी कर्मचार्याचे नाव असून चोरीच्या याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत आहे.
यातील तक्रारदार नायगाव परिसरात राहत असून कांदिवलीतील एका हॉटेलमध्ये कामाला आहे. या हॉटेलमध्ये करणलालसह इतर सोळा कर्मचारी कामाला आहे. दिवसा काम केल्यानंतर हॉटेल मालकांनी कर्मचार्यांच्या रात्रीच्या वेळेस झोपण्याची व्यवस्था कांदिवलीतील डहाणूरकरवाडीत केली होती. तिथे या कर्मचार्यांसाठी एक भाड्याने रुम घेण्यात आले होते. करणलाल याच्यावर सकाळी हॉटेल उघडणे आणि रात्रीच्या वेळेस हॉटेल बंद करण्याची जबाबदारी होती.
हॉटेलचे मालक आठवड्यातून एकदा हॉटेलमध्ये येत होते. संपूर्ण हिशोब तपासून जमा होणारी कॅश बँकेत जमा करत होते. याच दरम्यान ही कॅश हॉटेलमधील सेफ लॉकरमध्ये ठेवली जात होती. 23 ऑक्टोंबरला करणलालने सेफ लॉकरमधील सुमारे पावणेदोन लाखांची कॅश चोरी करुन पलायन केले होते. हा प्रकार नंतर मालकाच्या निदर्शनास येताच त्यांनी हॉटेलमधील सीसीटिव्ही फुटेजची पाहणी केली होती. त्यात करणलाल हा 23 ऑक्टोंबरला रात्री सव्वाबारा ते साडेबाराच्या दरम्यान कॅश चोरी करताना दिसून आला होता.
हा प्रकार उघडकीस येताच मालकाच्या सूचनेनंतर तक्रारदारांनी कांदिवली पोलिसांना हा प्रकार सांगून करणलालविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पोलिसांनी चोरीचा गुन्हा नोंदवून पळून गेलेल्या नोकराचा शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना पळून गेलेल्या करणलाल दोन दिवसांपूर्वी पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्यांत अटक केली. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याच्याकडून चोरीची सर्व कॅश लवकरच हस्तगत केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.