शीव-परळ येथे दोन वेगवेगळ्या घरफोडीच्या घटना
घरात कोणीही नसताना चौदा लाखांच्या मुद्देमालावर डल्ला
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२३ फेब्रुवारी २०२४
मुंबई, – शीव आणि परळ येथील दोन वेगवेगळ्या घरफोडीच्या घटनेत अज्ञात चोरट्यांनी घरात कोणीही नसल्याची संधी साधून सुमारे चौदा लाखांच्या मुद्देमालावर डल्ला मारला. याप्रकरणी भोईवाडा आणि शीव पोलिसांनी दोन स्वतंत्र घरफोडीच्या गुन्ह्यांची नोंद केली आहे. परिसरातील सीसीटिव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेऊन पळून गेलेल्या आरोपींची ओळख पटवून त्यांच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेतली होती. यातील एका घटनेत मुलीच्या लग्नासाठी ठेवलेले सोन्याचे दागिने आणि तीन लाखांच्या कॅश चोरट्याने पळविल्याने या कुटुंबियांला प्रचंड मानसिक धक्का बसल्याचे बोलले जाते.
गीता जोगेंद्र शर्मा ही महिला शीव येथी जय संतोषी माता नगरमध्ये राहते. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यांत तिच्या मुलाचे लग्न झाले होते तर एप्रिल २०२४ रोजी तिच्या मुलीचा लग्न ठरले होते. या दोन्ही लग्नाचे सोन्याचे दागिन्यासह तीन लाखांची कॅश तिने तिच्या कपाटात ठेवले होते. ५ जानेवारी २०२४ रोजी संपूर्ण कुटुंबिय लग्नाच्या तयारीनिमित्त उत्तरप्रदेशातील गावी गेले होते. २० फेब्रुवारीला ते सर्वजण घरी आले होते. यावेळी त्यांना त्यांच्या घरी चोरी झाल्याचे दिसून आले. अज्ञात चोरट्याने घरात कोणीही नसल्याचा फायदा घेऊन कपाटातील सोन्याचे दागिने आणि तीन लाख रुपयांची कॅश असा सुमारे साडेसहा लाखांचा मुद्देमाल चोरी केला होता. हा प्रकार निदर्शनास येताच शर्मा कुटुंबियांना प्रचंड मानसिक धक्का बसला होता.
दुसर्या घटनेतील तक्रारदार तुहीन रंगलाल धारा हे व्यापारी असून त्यांचा सोन्याचे दागिने बनविण्याचा व्यवसाय आहे. ते त्यांच्या पत्नी आणि मुलासोबत परळ येथील आचार्य दोंदे मार्ग, पर्ल मेन्शन अपार्टमेंटच्या पहिल्या मजल्यावर राहता. १५ फेब्रुवारी ते १९ फेब्रुवारी या कालावधीत ते त्यांच्या कुटुंबियांसोबत गोवा येथे फिरायला गेले होते. सोमवारी दुपारी पावणेदोन वाजता ते त्यांच्या घरी आले होते. यावेळी घरात कोणीही नसल्याचा फायदा घेऊन त्यांच्या घरी घरफोडी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले होते. चोरट्याने घरात प्रवेश करुन सोन्याचे विविध दागिने आणि वीस हजार रुपयांची कॅश असा सुमारे सव्वासात लाखांचा मुद्देमाल चोरी केला होता.हा प्रकार उघडकीस येताच या दोघांनी भोईवाडा आणि शीव पोलिसांत घरफोडीची तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी दोन स्वतंत्र घरफोडीच्या गुन्ह्यांची नोंद करुन पळून गेलेल्या आरोपींचा शोध सुरु केला आहे.