घरफोडीच्या आंतरराज्य बांगलादेशी टोळीचा गुन्हे शाखेकडून पर्दाफाश
मुख्य आरोपीसह सातजणांना अटक; ५३ घरफोडीच्या गुन्ह्यांची उकल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१० मार्च २०२४
मुंबई, – मुंबईसह महाराष्ट्र, कोलकाता, गुजरात, तेलंगणा राज्यात दिवसा रेकी करुन रात्रीच्या वेळेस घरफोडी करणार्या एका आंतरराज्य बांगलादेशी टोळीचा गुन्हे शाखेच्या प्रॉपटी सेलच्या अधिकार्यांनी पर्दाफाश करुन या टोळीच्या प्रमुखासह सात सहकार्यांना जालना शहरातून शिताफीने अटक केली. गेल्या दोन वर्षांपासून या टोळीच्या मागावर मुंबई पोलीस होते, अखेर या सर्वांना गजाआड करण्यात पोलिसांना यश आले आहे. या टोळीच्या अटकेने विविध राज्यातील घरफोडीच्या ५३ हून अधिक गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. अटक आरोपींमध्ये शाकीर ऊर्फ गुड्डू हैदर शेख, कुर्बान शाहिन आलम मंडल, जाकीर फकीर बारीक फकीर, मानिक मुस्लिम शेख, शुभोन जाबीरअली शेख शेख, सलमान शुभन शेख आणि अरबाज समीर मंसुरी यांचा समावेश आहे. शाकीर हा टोळीचा प्रमुख तर अरबाज हा चोरीचा माल खरेदी करणारा आरोपी असल्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक शशिकांत पवार यांनी सांगितले. अटकेनंतर या सर्वांना किल्ला कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांच्या अटकेने घरफोडीच्या इतर काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
दोन वर्षांपूर्वी प्रॉपटी सेलने घरफोडीच्या एका गुन्ह्यांचा संमातर तपास सुरु केला होता. या तपासादरम्यान या गुन्ह्यांत शाकीर ऊर्फ गुड्डू या आरोपीचा सहभाग उघडकीस आला होता. शाकीर हा घरफोडीच्या गुन्ह्यांतील रेकॉर्डवरील गुन्हेगार होता. गेल्या दोन वर्षांपासून तो पोलिसांना सतत गुंगारा देत होता. त्यामुळे त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरु असताना शाकीर हा त्याच्या सहकार्यासोबत जालना परिसरात लपला असल्याची माहिती प्रॉपटी सेलच्या अधिकार्यांना मिळाली होती. या माहितीनंतर प्रभारी पोलीस निरीक्षक शशिकांत पवार यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक संदीप निगडे व त्यांच्या पथकाने जालना येथील परतूर परिसरातील एका दुमजली इमारतीमध्ये वास्तव्यास असलेल्या शाकीरसह त्याच्या सहा सहकार्यांना ताब्यात घेतले होते. यावेळी त्यांच्याकडून पोलिसांनी एक कार, कटावणी, स्क्रू ड्राव्हर, चॉपर, कोयता आदी मुद्देमाल जप्त केला होता. चौकशीत सहाही आरोपी बांगलादेशी नागरिक असून घरफोडीच्या गुन्ह्यांतील रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे उघडकीस आले. या टोळीचा प्रमुख शाकीर असून त्यानेच त्याच्या बांगलादेशी सहकार्यांच्या मदतीने एक टोळी बनविली होती. ही टोळी दिवसा रेकी करुन रात्रीच्या वेळेस घरफोडी करत होती.
शाकीरला यापूर्वी घरफोडीच्या गुन्ह्यांत पोलिसांनी अटक केली असून यातील चार गुन्ह्यांत त्याला शिक्षा झाली आहे. आठ गुन्ह्यांत त्याच्याविरुद्ध अजामिनपात्र तर एका गुन्ह्यांत जामिनपात्र वॉरंट बजाविण्यात आले आहे. अन्य एका गुन्ह्यांत त्याच्याविरुद्ध जाहीरनामा प्रस्तावित करण्यात आला आहे. मुंबईसह आसपासच्या विविध पोलीस ठाण्यात या टोळीविरुद्ध तीसहून अधिक घरफोडीच्या गुन्ह्यांची नोंद आहे. शाकीर हा विमानाने कोलकाता, गुजरात, महाराष्ट्र तसेच तेलंगणा राज्यात जाऊन रेकी करुन ही घरफोडी करत असल्याचे उघडकीस आले. चोरीनंतर ते सर्वजण बांगलादेशात पळून जात होते. चोरीचा मुद्देमाल ते अरबाज मंसुरीला विकत होते. या गुन्ह्यांत त्याचा सहभाग उघडकीस येताच त्याला नंतर पोलिसांनी ताब्यात घेतले होते.
मुंबईत चौकशीसाठी आणल्यानंतर या सातही आरोपींना पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्यांना किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. या आरोपींच्या अटकेने मुंबईतील अठरा, भुसावळ, जालना जिल्ह्यांतील तीन,तेलंगणा-निजामाबाद येथील तेरा, तेलंगणा-हैद्राबाद येथील सात, गुजरात-अहमदाबाद येथील चार तर कोलकाता येथील हावडा, वर्धमान परिसरतील सात अशा ५३ गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे.
घरफोडीच्या गुन्ह्यांतील या बांगलादेशी टोळीचा पर्दाफाश करणार्या सहाय्यक पोलीस आयुक्त दत्तात्रय नाळे, प्रभारी पोलीस निरीक्षक शशिकांत पवार, पोलीस निरीक्षक संदीप निगडे, सहाय्यक फौजदार उमेश राऊत, रमेश पासी, पोलीस हवालदार अरुण सावंत, चिंतामण इरनक, तुषार सावंत, विनोद पद्मन, विश्वनाथ पोळ, सचिन सावंत, संतोष ओटे, पोलीस शिपाई आदित्य जाधव, महिला पोलीस शिपाई रंजना निचिते, पोलीस शिपाई चालक शरद मुकूंदे यांचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त लखमी गौतम, अतिरिक्त पोलीस आयुक्त शशीकुमार मीना, पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांनी कौतुक केले आहेत.