जोगेश्वरीतील वयोवृद्ध महिलेच्या घरी झालेल्या घरफोडीचा पर्दाफाश
रेकॉर्डवरील गुन्हेगाराला अटक; दोन गुन्ह्यांची उकल करण्यात यश
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१८ फेब्रुवारी २०२४
मुंबई, – जानेवारी महिन्यांत जोगेश्वरीतील एका वयोवृद्ध महिलेच्या घरी झालेल्या घरफोडीचा पर्दाफाश करण्यात आंबोली पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी फिरोज नईम अहमद कुरेशी या ३९ वर्षांच्या गुन्हेगारास पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीस गेलेले सर्व सोन्याचे दागिने पोलिसांनी जप्त केले आहे. फिरोज हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध विविध पोलीस ठाण्यात तेराहून अधिक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे तर त्याच्या अटकेने आंबोली पोलीस ठाण्यात झालेल्या दोन घरफोडीच्या गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे.
ही घटना ३१ जानेवारी २०२४ रोजी सकाळी अकरा ते सायंकाळी साडेपाचच्या सुमारास जोगेश्वरीतील एस. व्ही मालकाम बाग, वाडिया ब्लॉक, इमारत क्रमांक चौदामध्ये घडली होती. या इमारतीच्या फ्लॅट क्रमांक एकमध्ये रोशन रुस्तमबिनी मौर्या ही ७३ वर्षांची वयोवृद्ध महिला राहते. ३१ जानेवारी ती कामानिमित्त बाहेर गेली होती. यावेळी तिच्या घरी कोणीही नव्हते. हीच संधी साधून अज्ञात चोरट्याने तिच्या घरात प्रवेश करुन विविध सोन्याचे दागिने असा पाच लाख सोळा हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी करुन पलायन केले होते. सायंकाळी घरी आल्यानंतर हा प्रकार उघडकीस येताच तिने आंबोली पोलिसांत घरफोडीची तक्रार केली होती. तिच्या तक्रारीनंतर पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा नोंदविला होता.
गेल्या काही महिन्यांत अंधेरीसह जोगेश्वरी परिसरातील वाढत्या घरफोडीच्या घटनेची पोलीस आयुक्त राज तिलक रोशन, सहाय्यक पोलीस आयुक्त सूर्यकांत बांगर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयवंत शिंदे यांनी गंभीर दखल घेत गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर पोलीस निरीक्षक संजय चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिभाऊ बिरादार, पोलीस हवालदार दुलम, पाटील, राणे, ढेमरे, कासार, घुगे, बाबर, सांगळे यांनी तपासाला सुरुवात केली होती. परिसरातील सीसीटिव्ही फुटेज ताब्यात घेतल्यानंतर आरोपीची ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न सुरु केले होते.
या फुटेजसह मिळालेल्या माहितीवरुन वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयवंत शिंदे, पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय हरिभाऊ बिरादार व अन्य पोलीस पथकाने फिरोज कुरेशी याला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीदरम्यान त्यानेच ही घरफोडी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून चोरीस गेलेले पाच लाख सोळा हजार रुपयांचे सर्व दागिने हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. फिरोज हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध आंबोली, ओशिवरा, बांगुरनगर, मालाड पोलीस ठाण्यात तेराहून अधिक गुन्ह्यांची नोंद आहे. त्याच्या अटकेने आंबोली पोलीस ठाण्यातील दोन घरफोडीच्या गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. अटकेनंतर त्याला अंधेरीतील स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते.