कुलाबा येथे वयोवृद्ध महिलेच्या घरी दहा लाखांची घरफोडी

ड्रग्जच्या आहारी गेलेल्या नातूसह तरुणीवर चोरीचा संशय

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
४ मार्च २०२४
मुंबई, – कुलाबा येथे मासे विक्री करणार्‍या एका वयोवृद्ध महिलेच्या घरी घरफोडी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. अज्ञात चोरट्यांनी कपाटातील सुमारे दहा लाखांचा मुद्देमाल चोरी केला असून त्यात साडेचार लाखांची कॅश आणि साडेपाच लाखांच्या सोन्याचा दागिन्यांचा समावेश आहे. याप्रकरणी कुलाबा पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. तक्रारदार महिलेने तिच्या नातेवाईकांविरुद्ध चोरीचा संशय व्यक्त केल्याने या दोन्ही नातेवाईकांची पोलिसाकडून चौकशी होणार आहे.

ही घटना रविवारी सकाळी साडेनऊ ते दुपारी साडेचारच्या सुमारास कुलाबा येथील एन. ए सावंत मार्ग, सौरभ मेन्शन इमारतीमध्ये घडली. या इमारतीच्या रुम क्रमांक सातमध्ये मुमताज मुन्नाभाई अन्सारी ही ७९ वर्षांची वयोवृद्ध महिला एकटीच राहते. गेल्या ५० वर्षांपासून ती ससून डॉक येथे मासे विक्रीचा व्यवसाय करते. त्यातून तिने काही सोन्याचे दागिने आणि कॅश जमा करुन ठेवली होती. दागिने आणि कॅश ती तिच्या कपाटातील लॉकरमध्ये ठेवत होती. याच इमारतीमध्ये तिचा मुलगा आणि इतर नातेवाईक राहतात. गेल्या दहा दिवसांपासून तिची प्रकृती ठिक नव्हती. त्यामुळे तिने शेजारीच राहणार्‍या सरफु खान यांची नात आलिया हिला तिच्यासोबत झोपण्यासाठी घरी बोलाविले होते. याच दरम्यान तिच्या घरातून तिजोरीतील दहा ते बारा चाव्याचा गुच्छ हरविल्या होत्या. त्यामुळे तिच्या मुलाने काही दागिने त्याच्या रुममध्ये ठेवले होते.

रविवारी सकाळी प्रकृती ठिक वाटत असल्याने ती मासेविक्रीसाठी निघून गेली. दुपारी साडेचार वाजता ती घरी आली असता तिला तिच्या घरातील लॅचचे कुलूप तुटलेले दिसून आले. त्यामुळे तिने आत जाऊन पाहणी केली असता तिजोरीतील साडेचार लाखांची कॅश आणि साडेपाच लाख रुपयांचे विविध सोन्याचे दागिने चोरीस गेल्याचे निदर्शनास आले. तिने घरासह घराबाहेर मुद्देमालाचा शोध घेतला, मात्र तिला कुठेच दागिने व कॅश सापडली नाही. घरी चोरी झाल्याचे लक्षात येताच तिने कुलाबा पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. तिथे तिने अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीत तिने तिच्या ड्रग्जच्या आहारी गेलेल्या नातू सलमान आणि सरफू खान यांची नात आलिया यांच्यावर चोरीचा संशय व्यक्त केला आहे. त्यामुळे पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध घरफोडीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. तक्रारदार महिलेने सलमान आणि आलिया यांच्यावर चोरीचा संशय व्यक्त केल्याने या दोघांची पोलिसांकडून चौकशी होणार आहे. या चौकशीतून या घरफोडीचा पर्दाफाश होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page