घरफोडीच्या दोन गुन्ह्यांत सोळा लाख रुपयांची लूट
डॉकयार्ड रोड आणि नळबाजारातील दोन्ही घटना
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
११ मार्च २०२४
मुंबई, – घरफोडीच्या दोन गुन्ह्यांत अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करुन सुमारे सोळा लाख रुपयांचा मुद्देमाल पळवून नेला. त्यात साडेपाच लाख रुपयांच्या कॅशसहीत साडेदहा लाख रुपयांच्या सोन्याच्या विविध दागिन्यांचा समावेश आहे. या दोन्ही घटना डॉकयार्ड रोड आणि नळबाजार परिसरात घडल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी भायखळा आणि जे. जे मार्ग पोलिसांनी दोन स्वतंत्र घरफोडीच्या गुन्ह्यांची नोंद करुन पळून गेलेल्या आरोपींचा शोध सुरु केला आहे.
पहिली घटना रविवारी सायंकाळी सव्वासहा ते रात्री सव्वाआठच्या सुमारास डॉकयार्ड स्टेशनजवळील पाईन हॉटेलजवळील नासिर पॅलेस इमारतीमध्ये घडली. याच इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक चारमध्ये हातिम कमरोदिन उदयपूरवाला हे त्यांच्या कुटुंबियांसोबत राहतात. ते व्यवसायाने व्यापारी असून त्यांचा मनिष मार्केटमध्ये इमिटेशन ज्वेलरी आणि चप्पल-बूट विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांना दोन मुली असून त्यांच्या विवाहासाठी त्यांनी काही सोन्याचे दागिने बनवून घरातील कपाटात ठेवले होते. रविवारी बोरी समाजाचा रमजान ईदचा पहिला रोजा असल्याने ते त्यांच्या कुटुंबियांसोबत नमाज पठनासाठी तांबावाला कंपाऊंड, हातिमी मशिदीत गेले होते. रात्री सव्वाआठ वाजता ते घरी आले होते. यावेळी त्यांना त्यांच्या फ्लॅटचा दरवाजा उघडा असल्याचे दिसून आले. दरवाज्याची कडी तुटलेली होती. आत प्रवेश केल्यानंतर त्यांना घरफोडी झाल्याचे दिसून आले. अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करुन कपाटातील सुमारे सुमारे साडेदहा लाख रुपयांचे २११ ग्रॅम वजनाचे विविध सोन्याचे दागिने चोरी केले होते. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी भायखळा पोलिसांना ही माहिती दिली. या माहितीनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी हातिम उदयपूरवाला यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला होता.
नळबाजार येथील काचवाला इमारतीमध्ये घडली. याच इमारतीमध्ये अतहर रियाज मिर्झा हे वयोवृद्ध व्यापारी राहत असून त्यांचा सुपारी विक्रीचा व्यवसाय आहे. नळबाजार मार्केटमध्ये त्यांचे मिर्झा सुपारीवाला नावाचे एक दुकान आहे. गुरुवारी ७ मार्चला ते घरातून दुकानात गेले होते. यावेळी त्यांच्या घरी कोणीही नव्हते. हीच संधी साधून अज्ञात चोरट्याने बोगस चावीने घरात प्रवेश करुन कपाटातील साडेपाच लाखांची कॅश चोरी करुन पलायन केले होते. रात्री आठ वाजता हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी जे. जे मार्ग पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी घाफोडीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. या दोन्ही घरफोडीच्या गुन्ह्यांची पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे. परिसरातील सीसीटिव्ही फुटेज ताब्यात घेण्यात आले असून या फुटेजवरुन पळून गेलेल्या आरोपींचा शोध सुरु आहे.