मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
6 मार्च 2025
मुंबई, – फसवणुकीसाठी सायबर ठग हे दरवेळी नवनवीन युक्त्या शोधून काढतात. नवीन ट्रेंडनुसार ते नागरिकांना गंडा घालतात. आता ठगाने आपला मोर्चा हाय सिक्युरिटी नंबर प्लेट नोंदणीकडे वळवला आहे. वाहनांची हाय सिक्युरीटी नोंदणी प्लेटची (एचएसआरपी ) बनावट लिंक तयार करून वाहन मालकाची फसवणूक झाली आहे. याबाबत पहिला गुन्हा मुंबईत दाखल करण्यात आला आहे.
नुकतेच परिवहन विभागाने शहरात हाय सिक्युरिटी नोंदणी नंबर प्लेट (एचएसआरपी ) करण्याचे आदेश दिले होते. २०१९ पूर्वी नोंदणी केलेल्या वाहनांना ३० एप्रिल पर्यंत ही नंबर प्लेट बसवणे बंधनकारक असणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार वाहनांनी ती प्लेट लावणे सक्तीचे आहे. त्यानुसार राज्यात नंबर प्लेट लावण्याचे काम सुरु झाले आहे.
आरटीओने वाहन मालकांना नंबर प्लेट साठी एक लिंक दिली आहे. त्यासाठी तीन व्हेंडर ची निवड करण्यात आली आहे. त्यापैकी एका व्हेंडर ने आरटीओ कडे तक्रार केली. काही सायबर ठगाने नंबर प्लेट नोंदणीसाठी बनावट लिंक्स तयार केल्या आहेत. ते वाहन धारकांकडून पैसे उकळण्याचे काम करतात. हा प्रकार लक्षात येताच आरटीओ च्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दक्षिण सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली. बनावट लिंक बाबत तक्रार दाखल केली. त्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंद केला. या प्रकरणाची चौकशी सुरु असल्याचे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.