मानवी बॉम्बच्या कॉलमुळे आंतरराष्ट्रीय विमानतळावर तणाव
महिलेची बदनामी करण्याच्या उद्देशाने कॉल केल्याचा अंदाज
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२५ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – मुंबईहून दिल्लीला जाणार्या विमानात एक महिला मानवी बॉम्ब असून तिच्याकडे दहशतवाद्याचे ८० ते ९० लाख रुपये आहेत. दिल्लीहून ती तिच्या प्रियकराला भेटण्यासाठी लंडनला जाणार असल्याचा कॉल दिल्लीतील आंतरराष्ट्रीय विमानतळावर आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. या माहितीनंतर दिल्लीला जाणार्या सर्व विमानासह प्रवाशांची झडती घेण्यात आली होती, मात्र काहीही आक्षेपार्ह सापडले नाही. त्यामुळे मानवी बॉम्बची ती अफवा असल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी सहार पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. संबंधित महिलेला बदनाम करण्याच्या उद्देशाने अज्ञात व्यक्तीने हा कॉल केल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
गुरुवारी रात्री साडेबारा वाजता दिल्लीतील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कंट्रोल रुमला ८३३३८४०२१ या मोबाईल क्रमांकावरुन एक कॉल आला होता. या व्यक्तीने गौरी बारवाणी ही महिला अंधेरीतील जे. पी रोड, सी साईट इमारतीच्या दुसर्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक २४ मध्ये राहते. ती मानवी बॉम्ब आहे. मुंबईहून दिल्लीला जाणार्या विमानाने ती प्रवास करत असून दिल्लीहून ती विदेशात जाणार आहे. तिचा प्रियकर लंडनला राहतो. त्याला भेटण्यासाठी ती लंडन जाणार आहे. तिच्याकडे ८० ते ९० लाख रुपये आहेत. ही रक्कम दहशवाद्यांचे आहेत असे सांगून त्याने कॉल बंद केला होता. विमानात मानवी बॉम्बच्या या कॉलनंतर ही माहिती छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील कंट्रोल रुमला देण्यात आली होती. या माहितीनंतर या अधिकार्यांनी स्थानिक पोलिसांसह बॉम्बशोधक नाशक आणि श्वान पथकासह दिल्लीला जाणार्या प्रत्येक विमानासह प्रवाशांची तपासणी सुरु केली होती. रात्री उशिरापर्यंत ही तपासणी सुरु होती. मात्र पोलिसांना काहीही आक्षेपार्ह सापडले नाही. त्यामुळे मानवी बॉम्बची ती अफवा असल्याचे उघडकीस आले.
अज्ञात व्यक्तीने गौरी बारवाणी या महिलेच्या नावासह तिच्या राहण्याची माहिती सांगितली होती. त्यामुळे तो तिच्या परिचित असून तिला बदनाम करण्याच्या उद्देशानेच तिने हा कॉल केला होता का याचा आता पोलीस तपास करत आहेत. धमकी कॉल आलेल्या क्रमांकाचे सीडीआर काढण्यात येत आहे. या व्यक्तीचा शोध सुरु आहे. त्याच्या अटकेने कॉल करण्यामागे त्याचा काय उद्देश होता याचा उलघडा होणार आहे. दरम्यान या धमकीची वरिष्ठांकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. याप्रकरणी स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेला संमातर तपासाचे आदेश देण्यात आले आहे. दरम्यान गेल्या दहा दिवसांत अशाच प्रकारे अनेक कॉलमुळे पोलीस यंत्रणेची चांगलीच तारांबळ उडाली होती. आतापर्यंत आलेले सर्व कॉल बोगस असल्याचे तपासणीनंतर उघडकीस आले.