मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
26 मे 2025
मुंबई, – विदेशात नोकरीच्या आमिषाने मानवी तस्करी करणार्या एका मुख्य आरोपीस छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर इमिग्रेशन अधिकार्यांनी ताब्यात घेऊन सहार पोलिसांच्या स्वाधीन केले. पार्थकुमार अजयकुमार चौहाण असे या आरोपीचे नाव असून अटकेनंतर त्याला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या कारवाईत पोलिसांनी दोन बेरोजगार तरुणांची सुटका केली असून ते दोघेही गुजरातचे रहिवाशी आहे. या दोघांचा नोकरीच्या आमिषाने विदेशात चॅटिंग स्कॅमसाठी वापर केला जाणार असल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
दिपचंद लालजी सिंह हे अॅण्टॉप हिल परिसरात राहत असून छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर इमिग्रेशन अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. रविवारी रात्री आठ वाजता ते कामावर हजर झाले होते. काऊंटर तेरावर विदेशात जाणार्या प्रवाशांच्या इमिग्रेशन तपासणीचे काम करत होते. याच दरम्यान तिथे पार्थकुमार चौहाण हा प्रवाशी आला होता. त्याच्यासोबत यश मनूभाई प्रजापती आणि अरुण शानबाग जिंजाला असे दोनजण होते. त्यांच्या बोर्डिंग पासची तपासणी केलनंतर ते तिघेही व्हिएनाममार्गे लाओसला जाण्यासाठी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आले होते. या तिघांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर पार्थकुमारला लाओसला जाण्याबाबत विचारणा करण्यात आली होती. मात्र याबाबत त्याला समाधानकारक उत्तर देता आले नाही.
त्याची माहिती काढण्याचा प्रयत्न केला असता पार्थकुमार हा 15 डिसेंबर 2022 ते 13 फेब्रुवारी 2023 या कालावधीत दुबईतील एका एजंटच्या माध्यमातून लाओसला काम करत होता. त्याने चॅटिंग स्कॅमच्या माध्यमातून अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया येथील नागरिकांशी फेसबुक चॅटींगच्या माध्यमातून संपर्क साधून त्यांना क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणुक करण्यास प्रवृत्त करुन त्यांची फसवणुक केल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर तो भारतात आला होता. डिसेंबर 2024 ते मार्च 2025 या कालावधीत तो पुन्हा लाओसला गेला होता. तिथे त्याने पुन्हा काही विदेशी नागरिकांची चॅटिंग स्कॅमच्या माध्यमातून फसवणुक केली होती. त्याच्यासोबत असलेल्या यश आणि अरुण या दोघांनाही त्याने विदेशात नोकरीचे आमिष दाखविले होते. त्यांना दरमाह साठ ते सत्तर हजार रुपयांचे वेतन देण्याचे आश्वासन दिले होते.
गुजरातचे रहिवाशी असलेले ते दोघेही पदवीधर असून त्यांचे बीसीएपर्यंत शिक्षण झाले आहे. लाओस येथे त्यांना संगणकावर काम करण्याचे नोकरीची ऑफर देण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात त्यांचा चॅटिंग स्कॅमसाठी वापर केला जाणार होता. पार्थकुमारने मानवी तस्करीच्या हेतून या दोघांना विदेशात नोकरीचे आमिष दाखवून त्यांचा फसवणुकीसाठी वापर करणार होता. हा प्रकार उघडकीस येताच या तिघांनाही पुढील चौकशीसाठी सहार पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले होते.
याप्रकरणी दिपचंद सिंह यांच्या तक्रारीवरुन पार्थकुमार चौहाणविरुद्ध पोलिसांनी विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. याच गुन्हयांत नंतर त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. चॅटिंग स्कॅमच्या माध्यमातून विदेशी नागरिकांची फसवणुक करणारी ही टोळी असून या टोळीतील इतर आरोपींचा सहभाग उघडकीस आला आहे. त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.