वाढदिवसाचा केक उशिराने आणला म्हणून पत्नीसह मुलावर हल्ला
हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा नोंदवून पळून गेलेल्या पतीचा शोध सुरु
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
३ जून २०२४
मुंबई, – वाढदिवसाचा केक उशिराने आणला या क्षुल्लक कारणावरुन झालेल्या वादातून पतीने त्याच्याच पत्नीसह मुलावर चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना साकिनाका परिसरात उघडकीस आली आहे. या हल्ल्यात मुलगा सुनिल राजेंद्र शिंदे हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर राजावाडी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहे तर पत्नी रंजना राजेंद्र शिंदे हिला प्राथमिक औषधोपचारानंतर सोडून देण्यात आले. तिच्या तक्रारीवरुन साकिनाका पोलिसांनी आरोपी पती राजेंद्र धोडींबा शिंदे याच्याविरुद्ध हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. पळून गेलेल्या राजेंद्रच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
रंजना ही तिचा पती आणि मुलासोबत साकिनाका परिसरात राहते. ती घरकाम करते तर तिचा मुलगा एका खाजगी कंपनीत कामाला आहे. रविवारी राजेंद्रचा वाढदिवस होता. त्यामुळे त्याने रंजनाला रात्री कामावरुन येताना केक आणण्यास सांगितले होते. शनिवारी ती नेहमीप्रमाणे कामावर निघून गेली तर तिचा मुलगा बाहेर गेला होता. रात्री या दोघांनाही घरी येण्यास उशीर झाला होता. मात्र त्यांनी आठवणीने केक आणला होता. वाढदिवसाचा केक उशिराने आणला म्हणून राजेंद्रला प्रचंड राग आला होता. याच कारणावरुन त्याने रंजनाला शिवीगाळ करुन मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी सुनिलने मध्यस्थी करुन त्यांच्यातील वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे राजेंद्रला आणखीन राग आला आणि त्याने घरातील चाकूने या दोघांवर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यानंतर तो घरातून पळून गेला. हा प्रकार समजताच स्थानिक रहिवाशांनी चाकू हल्ल्यात जखमी झालेल्या मायलेकाला तातडीने जवळच्या राजावाडी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथे रंजनावर प्राथमिक औषधोपचार करुन सोडून देण्यात आले तर सुनिलची दुखापत गंभीर असल्याने त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथेच त्याच्यावर उपचार सुरु आहेत.
राजावाडी हॉस्पिटलमधून ही माहिती नंतर साकिनाका पोलिसांना देण्यात आली. या माहितीनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी रंजनाने दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी राजेंद्र शिंदे याच्याविरुद्ध भादवीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. हल्ल्यानंतर राजेंद्र हा पळून गेल्याने त्याचा पोलीस शोध घेत आहेत. वाढदिवसाच्या दिवशीने आरोपी पतीने पत्नीसह मुलावर हलला केल्याने परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.