गुंतवणुकीच्या आमिषाने एकाच कुटुबातील चौघांची फसवणुक

1.82 कोटीच्या फसवणुकीप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
8 फेब्रुवारी 2026
मुंबई, – आयफोन व्यवसायात गुंतवणुकीवर दहा टक्के परतावा देतो असे सांगून एकाच कुटुंबातील चौघांची तीनजणांच्या टोळीने 1 कोटी 82 लाख रुपयांची फसवणुक केल्याचा धक्कादायक प्रकार घाटकोपर परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी एका बोगस कंपनीच्या तिघांविरुद्ध पंतनगर पोलिसांनी विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. संजय प्रधान, रमेश मदन पटेल आणि देवीबेन रमेश पटेल अशी या तिघांची नावे आहेत. या गुन्ह्यांत तिघांनाही पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्यांची पोलिसांकडून चौकशी आहे. या चौकशीनंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

ब्रिजेश रामरेखा पांडे हे घाटकोपरचे रहिवाशी असून व्यावसायिक आहेत. त्यांचा चेंबूर परिसरात हनुमान डेअरी नावाने दूधाचा व्यवसाय आहे. 2007 साली त्यांची रमेश पटेलशी ओळख झाली होती. त्याचा सोसायटी जनरल स्टोर नावाचे एक शॉप होते. अनेकदा तो त्यांच्याकडून उसने पैसे घेऊन दिलेल्या मुदतीत पैसे परत करत होता. त्यामुळे त्यांना त्याच्यावर प्रचंड विश्वास होता. तीन वर्षांपूर्वी तो त्यांच्या डेअरीजवळ आला होता. यावेळी त्याने तो गेल्या सहा वर्षांपासून आयफोनची एजन्सी घेतली आहे. आयफोन खरेदी करुन तो स्वस्तात कार्पोरेट सेक्टरमध्ये आयफोनची विक्री करतो. त्यातून त्याला चांगला फायदा झाला आहे.

याच दरम्यान त्याने त्याची संजय प्रधानशी ओळख करुन दिली होती. तो त्याला व्यवसायात मदत करतो असे सांगून त्यांनी त्यांना त्यांच्या व्यवसायात गुंतवणुकीचा सल्ला दिला होता. त्यांना दोन हजार आयफोनची ऑर्डर मिळाली आहे, त्यात त्यांना प्रचंड फायदा होणार आहे. त्यांनी त्यांच्यासोबत व्यवसायात गुंतवणुक केल्यास त्यांना दहा टक्के कमिशन देण्याचे आश्वासन देत त्यांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला होता. त्याचा सल्ला आवडल्याने त्यांनी त्याच्यासोबत व्यवसायात गुंतवणुक करण्याचा निर्णय घेतला होता. याबाबत त्यांनी त्यांची पत्नी अंबिका, मुलगा गौरव आणि मुलगा वैष्णवी यांना माहिती दिली होती.

त्यांनीही त्यांना व्यवसायात गुंतवणुकीचा सल्ला दिला होता. त्यानंतर त्यांनी त्यांच्यासह पत्नी आणि दोन मुलांच्या वतीने रमेश पटेल याच्या के. पी इंटरप्रायजेस कंपनीच्या बँक खात्यात 1 कोटी 82 लाख रुपयांची गुंतवणुक केली होती. हा संपूर्ण व्यवहार 14 डिसेंबर 2022 ते 3 ऑक्टोंबर 2023 या कालावधीत झाला होता. यावेळी त्यांच्यात कॉन्ट्रक्ट ऑफ इन्व्हेस्टमेंट करार झाला होता. ऑक्टोंबर 2023 पर्यंत संजय, रमेश आणि देवीबेन पटेल यांनी त्यांना नियमित गुंतवणुकीवर परतावा दिला होता. मात्र नंतर त्याने परतावा देण्यास बंद केले होते. विचारणा केल्यानंतर तो त्यांना आयफोन कंपनी नवीन व्हर्जन लाँच करणार आहे. त्यामुळे त्यांचा व्यवहार थांबला. तसेच त्याला स्वतचे एक शोरुम सुरु करायचे आहे. त्यानंतर त्यांच्यातील व्यवहार पुन्हा सुरळीत सुरु होईल असे सांगितले.

मात्र काही महिने उलटूनही त्याने त्यांनामूळ रक्कमेसह परतावा रक्कम दिला नाही. याबाबत कॉल केल्यानंतर त्यांनी त्यांना काही धनादेश दिले होते, मात्र ते धनादेश बँकेत टाकण्यास मनाई केली होती. चौकशीदरम्यान या तिघांनी आयफोनची एजन्सी सुरु केल्याचे सांगितले होते, प्रत्यक्षात त्यांनी कुठलीही एजन्सी सुरु केली नव्हती. तसेच त्यांच्या पैशांचा वापर त्यांनी आयफोन खरेदीसाठी केला नव्हता. या तिघांनी व्यवसायात गुंतवणुकीवर दहा टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून त्यांनी दिलेल्या पैशांचा वैयक्तिक फायद्यासाठी वापर करुन त्यांची फसवणुक केली होती. 1 कोटी 82 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर प्रत्येकाला 3 कोटी 68 लाख 61 हजार 096 प्रमाणे 14 कोटी 74 लाख 44 हजार 384 रुपये देण्याचे आमिष दाखवून त्यांच्या पैशांचा अपहार करुन फसवणुक केली होती.

हा प्रकार उघडकीस येताच ब्रिजेश पांडे यांनी त्यांच्याविरुद्ध पंतनगर पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर संजय प्रधान, रमेश पटेल आणि देवीबेन पटेल या तिघांविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुक तसेच महाराष्ट्र ठेवीदाराच्या अधिनियम कायदा कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याच गुन्ह्यांत या तिघांची पोलिसांकडून लवकरच चौकशी होणार आहे. त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स पाठविले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page