आईस्क्रिममध्ये सापडलेले ते बोट कंपनीच्या कर्मचार्‍याचा

मालाड पोलिसांना मिळालेल्या डीएनए रिपोर्टमध्ये उघड

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२७ जून २०२४
मुंबई, – जूनच्या तिसर्‍या आठवड्यात मालाड येथे आईस्क्रिममध्ये सापडलेले ते बोट कंपनीच्या कर्मचार्‍याचा असल्याचे डीएनए रिपोर्टवरुन उघडकीस आले आहे. काम करताना या कर्मचार्‍याच्या हाताला दुखापत झाली आणि ते बोट आईस्क्रिममध्ये पडले होते. त्यामुळे या घटनेमागे घातपात नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. या रिपोर्टमुळे ते बोट कर्मचार्‍याचे असल्याचे उघड झाले तरी ते बोट किती दिवसांपूर्वी कापले गेले होते हे आता फॉरेन्सिक रिपोर्टवरुन स्पष्ट होणार आहे. या रिपोर्टची पोलिसांना आता प्रतिक्षा आहे.

मालाड येथे राहणारा ब्रेंडन ऍटिक्स फेरॉव हा तक्रारदार तरुण डॉक्टर असून सध्या तो विलेपार्ले येथील एका खाजगी रुग्णालयात एमबीबीएस डॉक्टर म्हणून काम करतो. १२ जूनला त्याची बहिण जेसिकाने जेप्टो या ऑनलाईन ऍपवरुन एक किलो बेसन, तीन युम्मो मॅगो आईस्क्रिमची ऑर्डर केली होती. रात्री जेप्टो कंपनीचा प्रतिनिधी ऑर्डर घेऊन त्यांच्या घरी आला होता. यावेळी त्याने बेसनसोबत दोन मँगो कोन आईस्क्रिम आणि एक युममो बटरस्कॉच कोन आईस्क्रिम आणले होते. जेवण झाल्यानंतर रात्री पाऊणच्या ते सर्वजण आईस्क्रिम खात होते. यावेळी त्याच्या तोंडामध्ये काहीतरी तुकडा आला म्हणून त्याने तो तुकडा तोंडातून हातात घेतला. त्याचे निरीक्षण केले असता त्यात नख असलेला मांसचा तुकडा असल्याचे आढळून आले. त्यामुळे त्याने सोशल मिडीयावरुन युममो आईस्क्रिम कंपनीच्या पेजवर तक्रार केली होती. या तक्रारीनंतर कंपनीच्या कस्टमर केअरमधून त्याला कॉल आला होता. घडलेला प्रकार सांगितल्यानंतर या कर्मचार्‍याने त्याला आईस्क्रिमवरील कंपनीची छातील माहितीचा फोटो आणि ऑर्डर डिटेल्स पाठविण्यास सांगितले. त्यामुळे ती माहिती त्याला पाठवून दिली होती. दहा मिनिटांनी या कर्मचार्‍याने त्याला पुन्हा कॉल करुन त्याच्या तक्रारीची माहिती काढण्याचे काम सुरु असून लवकरच तुम्हाला माहिती दिली जाईल असे सांगितले. नंतर त्याच्याकडून काही प्रतिसाद आला नाही. त्यामुळे ते सर्वजण नख असलेला मांसचा तुकडा आईस बॅगमध्ये ठेवून मालाड पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी आले होते.

घडलेला प्रकार सांगून तिथे उपस्थित पोलिसांना सांगून त्याने युममो कंपनीसह संबंधित अधिकारी आणि कर्मचार्‍यांविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पोलिसांनी भादवीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला होता. तपासात ते आईस्क्रिम पुण्याच्या एका फॅक्टरीत तयार करण्यात आले होते. आईस्क्रिम पॅक करताना एका कर्मचार्‍याच्या हाताला अपघात झाला होता. त्याचा बोटाचा तुकडा आईस्क्रिममध्ये पडला होता. त्यामुळे ते बोट तपासणीसाठी फॉरेन्सिकलॅबमध्ये पाठवून या कर्मचार्‍याची डीएनए चाचण करण्यात आली होती. त्याचा रिपोर्ट पोलिसांना प्राप्त झाला असून ते बोट याच कर्मचार्‍याचे असल्याचे उघडकीस आले आहे. हा कर्मचारी तिथे फ्रुट रिडर मशिनमध्ये ऑपरेटर म्हणून काम करत असल्याचे पोलिसांनी सांगितले. आता पोलिसांना फॉरेन्सिकच्या रिपोर्टची प्रतिक्षा आहे. त्यावरुन ते बोट कधी कापले होते याचा खुलासा होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page