इडली गुरु हॉटेलची फ्रेन्चायझी देण्याच्या आमिषाने गंडा
दहा महिन्यांपासून वॉण्टेड असलेल्या मालकाला अटक
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
13 एपिल 2025
मुंबई, – इडली गुरु या हॉटेलची फ्रेन्चायझी देण्याच्या आमिष दाखवून एका व्यावसायिकाची फसवणुकप्रकरणी वॉण्टेड असलेल्या हॉटेलच्या मालकाला अखेर विलेपार्ले पोलिसांनी अटक केली. कार्तिक बाबू शेट्टी असे या आरोपी मालकाचे नाव असून फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत आहे. गुन्हा दाखल होताच कार्तिक हा पळून गेला होता, गेल्या दहा महिन्यांपासून त्याचा पोलिसांकडून शोध सुरु होता. अखेर शनिवारी त्याला अटक करण्यात पोलिसांना यश आल्याचे पोलिसांनी सांगितले. कार्तिकने अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे.
रवी कमलेश्वर पुजारी हे व्यावसायिक असून ते त्यांच्या कुटुंबियांसोबत विलेपार्ले परिसरात राहतात. नोव्हेंबर 2023 रोजी ते त्यांची पत्नी दिपा हिच्यासोबत अंधैरीतील वर्सोवा-यारी रोडवर फिरण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांना इडली गुरु नावाचे एक नवीन हॉटेल सुरु झाल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी तिथे जाऊन नास्ता केला होता. नास्ता आवडल्याने त्यांनी हॉटेल मॅनेजरकडून मालकाचा मोबाईल क्रमांक घेतला होता. काही दिवसांनी त्यांनी हॉटेलचा मालक कार्तिक शेट्टी यांना फोन केला होता. त्यांच्या हॉटेलमधील खाद्यपदार्थाची चव आवडल्याने त्त्याच हॉटेलची फ्रॅन्चायझी मिळवून हॉटेल व्यवसाय सुरु करण्याची इच्छा व्यक्त केली होती. यावेळी कार्तिक शेट्टीने त्यांना तो एक-दोन दिवसांत मुंबईत येणार आहे, त्यानंतर याविषयी सविस्तर चर्चा करु असे सांगितले होते.
मुंबईत आल्यानंतर त्यांची कार्तिकशी ओळख झाली होती. या ओळखीदरम्यान कार्तिक हा बंगलोरचा रहिवाशी असल्याचे समजले होते. त्याने त्यांना हॉटेल व्यवसायासाठी वीस लाख रुपये फ्रॅन्चायझी, तीन लाख साठ हजार जीएसटी आणि दहा हजार कस्टमर आयडी आऊटलेटसाठी दहा लाख रुपये 33 लाख 60 हजाराची मागणी केली होती. सविस्तर चर्चा झाल्यानंतर त्यांनी त्याला होकार दिला होता. त्यानंतर त्यांच्यात इडली गुरु या हॉटेल व्यवसायाचे एक करार झाला होता. त्यात हॉटेलचे भाडे, वीजबिल आणि कर्मचार्याचे वेतन रवी पुजारी देणार. व्यवसायातून मिळणार्या उत्पनापैकी 80 टक्के कार्तिक तर 20 टक्के रवी पुजारी यांना देण्याचे ठरले होते.
या करारानंतर रवी पुजारी यांनी विलेपार्ले येथील राममंदिर रोड, खाऊगल्लीत हॉटेलसाठी एक जागा भाड्याने घेतली होती. त्यासाठी ते 76 हजार रुपये भाडे देत होते तर डिपॉझिट म्हणून साडेतीन लाख रुपये जमा केले होते. ठरल्याप्रमाणे त्यांनी कार्तिकला 23 लाख 60 हजार रुपये दिले होते. मात्र दिलेल्या मुदतीत त्याने हॉटेल सुरु केल नाही. विचारणा केल्यानंतर तो विविध कारण सांगून त्यांना टाळण्याचा प्रयत्न करत होता. साठ दिवसांत हॉटेल सुरु करणे कार्तिकला बंधनकारक होते, मात्र त्याने त्याचे आश्वासन पाळले नाही. त्यामुळे त्यांनी त्यांच्यातील करार रद्द करुन हॉटेलसाठी दिलेल्या पैशांची मागणी सुरु केली होती. मात्र त्याने त्यांना पैसे परत केले नाही.
फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी कार्तिक शेट्टीविरुद्ध विलेपार्ले पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत दहा महिन्यांपासून फरार असलेल्या कार्तिकला अखेर विलेपार्ले पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडीत सुनावली आहे. प्राथमिक तपासात कार्तिकने अशाच प्रकारे इडली गुरु हॉटेलची फॅ्रन्चायझी देण्याची बतावणी करुन काही व्यावसायिकाची फसवणुक केल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे त्याचा संबंधित पोलिसांकडून लवकरच ताबा घेतला जाणार आहे.