मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
३० मे २०२४
मुंबई, – क्रेडिटवर घेतलेल्या इमिटेशन ज्वेलरीच्या १ कोटी ३९ लाख रुपयांच्या पेमेंटचा अपहार करुन गुजरातच्या एका व्यापार्याची फसवणुक झाल्याचा प्रकार पायधुनी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी या व्यापार्याच्या तक्रारीवरुन ज्युजर मुस्तशीर अंगुठीवाला या व्यापार्याविरुद्ध पायधुनी पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. याच गुन्ह्यांत ज्युजरची पोलिसांकडून चौकशी होणार आहे. या चौकशीनंतर त्याच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.
अंकुर सुरजभाई अंटाला हे व्यवसायाने व्यापारी असून ते त्यांच्या कुटुंबियांसोबत गुजरातच्या राजकोट शहरात राहतात. तिथे त्यांच्यासह त्यांच्या भावाचा इमिटेशन ज्वेलरी बनविण्याचा व्यवसाय आहे. त्यांचा स्वतचा एक कारखाना असून ते त्यांच्या ज्वेलरीचे मुंबईसह गुजरातमधील अनेक व्यापार्यांना विक्री करतात. आठ वर्षांपूर्वी त्यांची पायधुनीतील अल हिंद इंपोर्ट ऍण्ड एक्सपोर्ट कंपनीचे मालक ज्युजर अंगुठीवाला यांच्याशी ओळख झाली होती. या ओळखीनंतर त्याने त्यांच्याकडून काही इमिटेशन ज्वेलरी खरेदी केले होते. अनेकदा माल घेतल्यानंतर एक महिन्यानंतर ज्युजरकडून त्यांना पेमेंट दिले जात होते. व्यवहारात चोख असल्याने त्यांचा त्याच्यावर विश्वास बसला होता. २४ मार्च ते २ ऑगस्ट २०२२ या कालावधीत ज्युजरला त्यांच्यासह इतर कंपनीने ५ कोटी ६९ लाख रुपयांच्या मालाची डिलीव्हरी केली होती. त्यापैकी काही रक्कम त्यांनी दिले होते, मात्र वारंवार विचारणा करुनही ज्युजर हा त्यांच्या कंपनीचे उर्वरित पेमेंटची रक्कम १ कोटी ३९ लाख रुपये देत नव्हता. चौकशीदरम्यान त्यांच्याकडून घेतलेल्या मालाची त्यांनी इतर कंपन्यांना विक्री केली, या कंपनीकडून त्याला पेमेंट मिळाले होते. विविध कारण सांगून तो त्यांचे पेमेंट देण्यास टाळाटाळ करत होता. १ कोटी ३९ लाखांच्या पेमेंटचा अपहार करुन त्याने त्यांची फसवणुक केली होती. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी ज्युजर अंगुठीवाला याच्याविरुद्ध पायधुनी पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे.