पोस्ट खात्यात नोकरीच्या आमिषाने १९.६७ लाखांची फसवणुक

चार महिलांसह चौदा आरोपीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१४ ऑगस्ट २०२४
मुंबई, – पोस्ट खात्यात नोकरीच्या आमिषाने परभणीच्या एका शेतकर्‍याची १९ लाख ६७ हजाराची फसवणुक झाल्याचा प्रकार फोर्ट परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी चार महिलांसह चौदा आरोपीविरुद्ध माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिसांनी कट रचून पैशांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाजी तांबे, प्रदीप पाटील, फिदा सलमानी, असमा खान, सुमित्रा मुखर्जी, रमेश कोलते, विश्‍वनाथ मोरे, रवि डुलगज, रामचंद्र कांबळे, श्री जोशी, वंदना खंडागळे, विकास थोरवे, नितीन जगताप आणि मंगेश साबळे अशी या चौघांची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले.

सुदर्शन किशनराव ढोणे हे शेतकरी असून ते मूळचे परभणीच्या पूर्णा, पिंपळा लोखंडे, पांगरा गावचे रहिवाशी आहेत. नोव्हेंेबर २०२१ रोजी त्यांची आरोपींशी ओळख झाली होती. या ओळखीत त्यांनी त्यांना त्यांची पोस्ट विभागात चांगली ओळख आहे. त्यामुळे पोस्टात काम करण्यास इच्छुक असलेल्या बेरोजगार तरुणांना आपण नोकरी मिळवून देऊ असे सांगितले होते. त्यामुळे त्यांच्या परिचित नातेवाईकांसाठी नोकरीसाठी विनंती केली होती. नोकरीसाठी त्यांनी आरोपींना मे २०२३ पर्यंत १९ लाख ६७ हजार ५२२ रुपये दिले होते, मात्र दिलेल्या मुदतीत त्यांनी कोणालाही नोकरी दिली नाही. या आरोपींकडून टोलवाटोलवी होत असल्याने त्यांनी नोकरीसाठी दिलेल्या पैशांची मागणी सुरु केली होती. मात्र त्यांनी त्यांना पैसे परत केले नाही. फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस येताच सुदर्शन ढोणे यांनी संबंधित चौदा आरोपीविरुद्ध माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर चार महिलांसह चौदा आरोपीविरुद्ध पोलिसांनी १२० बी, ४०६, ४२०, ३४ भादवी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपी पळून गेल्याने त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या टोळीने पोस्टात नोकरीच्या आमिषाने अनेक बेरोजगार तरुणांची फसवणुक केल्याचे बोलले जाते.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page