गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाची फसवणुक
१ कोटी १० लाखांच्या अपहारप्रकरणी दहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
९ एप्रिल २०२४
मुंबई, – गोरेगाव येथील खाजगी पतपेढीत एक कोटीच्या गुंतवणुकीवर २४ तासांत सत्तर लाख रुपयांचा परताव्यासह मुद्दल रक्कम देण्याचे आमिष दाखवून एका व्यावसायिकाची फसवणुक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी दहाजणांविरुद्ध गोरेगाव पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. नयनसिंग लक्ष्मीकांत चौहाण, राहुल गायकवाड, किशोर भास्कर पाटील, अमोल हरिश्चंद्र गायकवाड, अमेंद्र कैलास ठाकूर, जितू, करण, गोविंद गुप्ता, विजय आणि पांडुरंग मालोडकर अशी या दहाजणांची नावे असून यातील नयनसिंग हा श्री हरि सहकारी सोसायटीचा संचालक असून इतर आरोपी त्याचे सहकारी आणि पदाधिकारी असल्याचे पोलिसांनी सांगितले. सर्व आरोपी पळून गेल्याने त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
मनोज प्रभूनारायण सिंग हे अंधेरी येथे त्यांच्या कुटुंबियांसोबत राहतात. त्यांचा आदिपा मरिन ऍण्ड सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड नावाची लॉजिस्टिक ऍण्ड ट्रान्सपोर्टचा व्यवसाय असून अंधेरीतील जे. बी नगर परिसरात त्यांचे एक खाजगी कार्यालय आहे. त्यापूर्वी ते एका खाजगी कंपनीत कामाला होते. यावेळी त्यांच्या कंपनीचे नवी मुंबईतील बेलापूर येथील एका बँकेत खाते होते. याच बँकेचा रिलेशनशीप अधिकारी अमोल गायकवाड हे त्यांच्या परिचित होते. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यांत त्यांना अमोलने फोन करुन त्यांना गुंतवणुकीची एक योजना सांगितली होती. या योजनेत गुंतवणुक केल्यास त्यांना काही तासांत चांगला परवाता मिळेल असे सांगितले होते. पुढे त्याने एक कोटीच्या गुंतवणुकीवर १ कोटी ७० लाख रुपये मिळतील असे सांगून त्यांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला होता. याच संदर्भात चर्चा करण्यासाठी अमोल त्यांना त्यांच्या कार्यालयात भेटण्यासाठी आला होता. या चर्चेदरम्यान त्याने गोरेगाव येथील जवाहरनगर, रोड क्रमांक एक, बाप्तीस्टा चाळीत श्री हरि सहकारी सोसायटी नावाची एक पतपेढी आहे. या पतपेढीत त्याने त्यांना एक कोटीची गुंतवणुक करण्याचा सल्ला दिला होता. यावेळी त्याने त्यांना २४ तासांत सत्तर लाखाच्या व्याजासहीत मुद्दल रक्कम अशी १ कोटी ७० लाख रुपये देण्याचे आश्वासन देताना त्याला २० लाख रुपये कमिशन म्हणून द्यावे लागतील असे सांगितले. ही रक्कम पतपेढीत डिपॉझिट करावी लागणार असल्याने त्यात कुठलीही फसवणुक होणार नाही याचीही खात्री दिली होती. त्यामुळे त्यांनी श्री हरी सहकारी सोसायटी पतपेढीत एक कोटी रुपयांची गुंतवणुकीचा निर्णय घेतला होता.
काही दिवसांनी त्याने त्यांची ओळख राहुल गायकवाड, करण, गोविंद गुप्ता, अमेंद्र ठाकूर, किशोर पाटील, विजय, नयनसिंग यांच्याशी ओळख करुन दिली. यातील काहींची ऑटोमोटीव्ह मॅन्युफॅक्चर्स कंपनी असून त्यांचे अनेक कंपन्यासोत टायअप आहे तर नयनसिंग हा व्यावसायिक असून त्यांच्याच मालकीची ही पतपेढी आहे असे सांगितले. त्यांनी त्यांना गुंतवणुकीच्या कामात मदत करण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे त्यांनी पतपेढीत स्वत खाते ओपन करुन त्यात एक कोटी दहा लाखांची गुंतवणुक केली होती. दुसर्या दिवशी त्यांना पासबुक देण्यात आले. त्यात त्यांनी एक कोटी दहा लाखांची गुंतवणुक केल्याची नोंद होती. या गुंतवणुकीनंतर त्यांना दुसर्या दिवशी आरटीजीएसद्वारे पैसे पाठविण्याचे आश्वासन दिले होते. मात्र दिलेल्या मुदतीत त्यांनी पैसे पाठविले नाही. त्यामुळे त्यांनी त्यांच्या खात्यातून पैसे काढून घेण्याची धमकी दिली होती. यावेळी आरोपींनी लवकरच त्यांना त्यांची रक्कम मिळेल असे सांगून त्यांना टाळण्याचा प्रयत्न केला. काही दिवसांनी त्यांच्या बँक खात्यात १ कोटी ८० लाख रुपये ट्रान्स्फर झाल्याचे स्क्रिनशॉट पाठविण्यात आला. मात्र ही रक्कम त्यांच्या खात्यात जमा झाली नव्हती.
गुंतवणुकीवर दुसर्या दिवशी चांगला परतावा देतो असे सांगून या आरोपींनी त्यांच्याकडून एक कोटी दहा लाख रुपये घेतले, मात्र कुठलाही परवाता न देता त्यांनी दिलेल्या पैशांचा अपहार करुन फसवणुक केली होती. फसवुणकीचा हा प्रकार लक्षात येताच त्यांनी गोरेगाव पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर संबंधित दहाही आरोपीविरुद्ध पोलिसांनी ४०६, ४२०, ४०९, ३४ भादवी सहकलम महाराष्ट्र ठेवीदाराच्या अधिनियम कायदा कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांच वरिष्ठांनी गंभीर दखल घेत गोरेगाव पोलिसांना तपासाचे आदेश दिले आहे. या आदेशानंतर पळून गेलेल्या आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या टोळीने अशाच प्रकारे इतर काही लोकांना गुंतवणुकीचे आमिष दाखवून त्यांची फसवणुक केली आहे का याचा पोलीस तपास करत आहेत.