व्यवसायातील गुंतवणुकीवर चांगल्या फायद्याच्या आमिषाने गंडा

२.९० कोटीच्या फसवणुकीप्रकरणी आरोपीस अटक व कोठडी

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
५ जुलै २०२४
मुंबई, – व्यवसायातील गुंतवणुकीवर चांगल्या फायद्याच्या आमिषाने एका प्रॉपटी व्यावसायिकाची २ कोटी ९० लाख रुपयांची फसवणुक केल्याप्रकरणी रुपेश शंकरलाल मंगे या मुख्य आरोपीस सांताक्रुज पोलिसांनी अटक केली. फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत रुपेश सध्या पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. त्याने व्यवसायातील गुंतवणुकीच्या नावाने अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केले आहेत का याचा पोलीस तपास करत आहेत.

मुस्तफा युशा काझी हे सांताक्रुज परिसरात राहत असून प्रॉपटी व्यावसायिक आहेत. गेल्या वर्षी मार्च महिन्यांत त्यांची नवी मुंबईतील ऐरोलीचा रहिवाशी असलेल्या रुपेश मंगे याच्याशी ओळख झाली होती. या ओळखीत त्याने त्यांना आर. एस कन्सलटन्सी नावाची एक कंपनी आहे. या कंपनीचे ऍमेझॉन या ऑनलाईन अमेरिकन बहुराष्ट्रीय ई-कॉमर्स कंपनीच्या ग्राहकांकडून परत आलेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तू ऍमेझॉन कंपनीमार्फत विकत घेऊन या वस्तूची बाजारात विक्री करण्याचा व्यवसाय असल्याचे सांगितले. त्यामुळे त्यांनी त्यांच्या व्यवसायात गुंतवणुक करावी, या गुंतवणुकीवर त्यांना पाच ते सात टक्के आकर्षक व्याजदर देण्याचे आमिष दाखवून त्यांचा विश्‍वास संपादन करण्याचा प्रयत्न केला होता. त्याच्या आकर्षक व्याजदराच्या आमिषाला बळी पडून त्यांनी मार्च २०२३ ते मार्च २०२४ या कालावधीत ३ कोटी १७ लाख रुपयांची गुंतवणुक केली होती. या गुंतवणुकीवर त्याने त्यांना काही महिने २६ लाख ८० हजार रुपयांचे व्याज दिले. मात्र नंतर व्याजाची रक्कम देणे बंद केले होते.

याबाबत विचारणा केल्यानंतर तो त्यांना विविध कारण सांगून टाळण्याचा प्रयत्न करत होता. त्याचा व्यवहार संशयास्पद वाटताच त्यांनी त्याच्याकडे गुंतवणुक केलेल्या पैशांची मागणी केली होती. सतत पैशांची मागणी होत असल्यो त्याने त्यांना आपण आत्महत्या करत असल्याची एक सुसायट नोट त्यांना व्हॉटअपवर पाठवून त्यांच्यावर दबाब आणण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांना पेमेंट केल्याचे बोगस स्क्रिनशॉट पाठवून त्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. व्यवसायातील गुंतवणुकीवर चांगल्या फायद्याचे आमिष दाखवून त्याने २ कोटी ९० लाखांचा अपहार करुन त्यांची फसवणुक केली होती. त्यामुळे मुस्तफा काझी यांनी सांताक्रुज पोलिसांत रुपेश मंगे याच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी ४०६, ४२०, ४६५, ४६७, ४७१ भादवी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच रुपेशला त्याला त्याच्या नवी मुंबईतील राहत्या घरातून पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला बुधवारी वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page