मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
११ एप्रिल २०२४
मुंबई, – गुंतवणुकीचे विविध मॅसेज पाठवून गुंतवणुकीवर चांगला परतावा देतो असे सांगून एका २५ वर्षांच्या तरुणाची ४ लाख ३५ हजाराची फसवणुक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी वर्सोवा पोलिसांनी फसवुणकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून अज्ञात व्यक्तीचा शोध सुरु केला आहे.
तक्रारदार तरुण अंधेरीतील वर्सोवा परिसरात त्याच्या आई-वडिलांसोबत राहत असून एका खाजगी कंपनीत कामाला आहे. त्याचे सोशल मिडीयावर एक अकाऊंट असून त्याने एका चॅनेलला गुतवणुकीसंदर्भात सबस्क्राईब केले होते. त्यानंतर त्याला विविध गुंतवणुकीबाबत मॅसेज येत होते. काही दिवसांपूर्वीच त्याला अज्ञात व्यक्तीने एक गुंतवणुक योजनेची माहिती देताना त्यात गुंतवणुक केल्यास त्याला चांगला परतावा मिळेल असे सांगितले होते. त्याच्या आमिषाला बळी पडून त्याने त्याच्या बँक खात्यातून संबंधित व्यक्तीने दिलेल्या बँक खात्यात ४ लाख ३५ हजाराची गुंतवणुक केली होती. मात्र वेबसाईटवर पाहणी केल्यानंतर त्याला त्याच्या नावावर गुंतवणुक केलेली रक्कम कुठेच दिसून आली नाही. त्यामुळे त्याने संबंधित व्यक्तीकडे विचारणा केली होती. मात्र त्याच्याकडून काहीच प्रतिसाद न मिळाल्याने त्याने वर्सोवा पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर अज्ञात व्यक्तीविरुद्ध पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला आहे. या गुन्ह्यांचा स्थानिक पोलिसांसह सायबर सेलचे अधिकारी संमातर तपास करत आहेत.