वर्ल्ड कप स्पेशल गुंतवणुक योजनेद्वारे महिलेला 40 लाखांना गंडा

कंपनीच्या मालकाला अटक; फसवणुकीचा आकडा वाढणार

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
22 मे 2025
मुंबई, – वर्ल्ड कप स्पेशल गुंतवणुक योजनेद्वारे एका महिलेला सुमारे 40 लाख रुपये गुंतवणुक करण्यास प्रवृत्त करुन तिची फसवणुक केल्याप्रकरणी एका खाजगी कंपनीच्या मालकाला गोवंडी पोलिसांनी अटक केली. प्रविण जोंगिदरपाल ओभान असे या आरोपी मालकाचे नाव असून अटकेनंतर त्याला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. प्रविणने विविध आकर्षक गुंतवणुक योजनेच्या बहाण्याने अनेकांना कोट्यवधी रुपयांना गंडा घातल्याचे बोलले जात असून या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तानाजी भगत यांनी सांगितले.

निलम सुभाष चिपळूणकर ही महिला करी रोड येथे राहत असून तिच्यासह तिचा पती सुभाष चिपळूणकर यांचा रियल इस्टेटचा व्यवसाय आहे. त्यांच्या एका मित्रामार्फत त्यांना प्रविण ओभान या व्यक्तीविषयी माहिती मिळाली होती. प्रविणचे चेंबूर येथे एम. एस फिन सर्व्हिस नावाची एक कंपनी असून ही कंपनी विविध गुंतवणुक योजनेत आकर्षक व्याजदर देते. जुलै 2024 रोजी निलम तिच्या पतीसोबत त्याच्या चेंबूर येथील कार्यालयात गेली होती. यावेळी प्रविणने त्यांना विविध गुंतवणुक योजनेची माहिती सांगितली होती. त्यात वर्ल्ड कप स्पेशल या पंधरा महिन्यांच्या गुंतवणुक योजनेत एकाच वेळेस 40 लाख रुपयांची गुंतवणुक केल्यास चौथ्या महिन्यांपासून आठ लाख रुपये तसेच वीस टक्के दराने बारा महिने 96 लाख रुपये मिळतील. तसेच गुंतवणुक केलेली रक्कम नंतर परत केली जाईल असे सांगण्यात आले होते.

या गुंतवणुक योजनेने प्रभावित होऊन निलम आणि सुभाष चिपळूणकर यांनी त्याच्या योजनेत गुंतवणुकीचा निर्णय घेतला होता. ठरल्याप्रमाणे त्यांनी जुलै 2024 रोजी टप्याटप्याने त्याच्याकडे 40 लाखांची गुंतवणुक केली होती. त्यानंतर त्यांच्यात एक करार झाला होता. ठरल्याप्रमाणे त्यांना तीन महिने काहीही परतावा मिळणार नव्हता. चौथ्या महिन्यांपासून पैसे मिळणार होते. मात्र त्यांनी त्याच्याकडे काहीतरी रक्कम देण्याची विनंती केली होती. त्यामुळे प्रविणने त्यांना ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोंबर 2024 या तीन महिन्यांत प्रत्येकी एक लाख रुपये आणि नोव्हेंबर 2024 मध्ये पाच लाख रुपये दिले होते. जानेवारी महिन्यांत त्याने त्यांना चार लाख रुपये दिले आणि उर्वरित चार लाख रुपये त्यांच्या सांगण्यावरुन दुसर्‍या मनी बॉण्ड डेली स्किममध्ये गुंतवणुक योजनेत जमा केली होती.

फेब्रुवारीनंतर त्याने परताव्याची रक्कम देणे बंद केले होते. त्यामुळे ते दोघेही त्याला सतत कॉल करत होते, मात्र त्याने त्यांना प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे त्यांनी त्याच्याकडे गुंतवणुक केलेल्या रक्कमेची मागणी सुरु केली होती. मात्र त्याने त्याला मूळ रक्कमेसह परतावा दिला नाही. अशा प्रकारे प्रविणने त्यांना विविध गुंतवणुक योजनेत पैसे जमा करण्यास प्रवृत्त केले, सुरुवातीला काही रक्कम दिली. मात्र नंतर मूळ रक्कमेसह परतावा न देता त्यांची फसवणुक केली होती.

अशा प्रकारे त्याने त्यांची 40 लाखांची फसवणुक केली होती. फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस येताच निलम चिपळूणकर हिने गोवंडी पोलिसात प्रविण ओभानविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुक, बेकायदेशीर ठेव योजना प्रतिबंध अधिनियम कायद्याच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता.

गुन्हा दाखल होताच प्रविणला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. प्राथमिक तपासात प्रविण ओभानने तक्रारदार महिलेसह इतर काही लोकांची फसवणुक केल्याचे बोलले जाते. त्यामुळे फसवणुकीचा हा आकडा आणखीन वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याच गुन्ह्यांत त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु असून या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page