गुंतवणुकीवर आकर्षक व्याज देण्याच्या आमिषाने फसवणुक
३७ लाखांच्या फसवणुकीप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१२ एप्रिल २०२४
मुंबई, – खाजगी कंपनीच्या गुंतवणुकीवर तीन महिन्यांत तीस टक्के व्याज देण्याचे आमिष दाखवून एका जोडप्याची सुमारे ३७ लाखांची फसवणुक झाल्याचा प्रकार मालाड परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी तिघांविरुद्ध मालाड पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. या तिघांमध्ये अझीम मसूद काझी, वसीम मसूद काझी आणि फुजर शेख यांचा समावेश असून पळून गेलेल्या या तिघांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.
तरन्नूमजहॉं खान ही तिचा पती शमीम खान याच्यासोबत मिरारोडच्या नयानगर, नरिंनदर पार्क अपार्टमेंटमध्ये राहते. दोन वर्षांची तिची तिन्ही आरोपीशी ओळख झाली होती. या तिघांची त्यांच्या मालकीची सागवे एक्सपोर्ट आणि काझीच सॉफ्टवेअर सोल्यूशन प्रायव्हेट लिमिटेड नावाच्या दोन कंपन्या असल्याचे सांगितले. व्यवसाय वाढीसाठी त्यांना गुंतवणूकदारांची गरज आहे. त्यामुळे त्यांनी त्यांच्या कंपनीत गुंतवणुक केल्यास तीन महिन्यांत तीस टक्के आकर्षक व्याज देण्याचे आश्वासन दिले होते. त्यांच्या आश्वासनाला बळी पडून तरन्नूमजहॉं आणि शमीम यांनी त्यांना मालाडच्या त्यांच्या बँक खात्यातून ३७ लाख रुपये ट्रान्स्फर केले होते. दिलेल्या तीन महिन्यांत त्यांनी गुंतवणुक रक्कमेसह व्याजाची रक्कम दिली नाही. विचारणा केल्यानंतर ते तिघेही त्यांना विविध कारण सांगून टाळण्याचा प्रयत्न करत होते. या तिघांकडून फसवणुक होत असल्याचे लक्षात येताच त्यांनी गुंतवणुक केलेल्या रक्कमेची मागणी सुरु केली होती. मात्र ३७ लाख रुपये परत न करता ते तिघेही पळून गेले होते.
या घटनेनंतर तरन्नूमजहॉं आणि शमीम खान यांनी पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांची भेट घेऊन त्यांना घडलेला प्रकार सांगितला होता. या तक्राराीची गंभीर दखल घेत त्यांनी त्यांचा तक्रार अर्ज मालाड पोलिसांकडे पाठविला होता. वरिष्ठांच्या आदेशानंतर तरन्नूमजहॉंच्या जबानीवरुन पोलिसांनी अझीम काझी, वसीम काझी आणि फुजर शेख या तिघांविरुद्ध ४०६, ४१९, ४२०, ३४ भादवी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून या तिघांनी गुंतवणुकीच्या नावाने इतर काही लोकांची फसवणुक केली आहे का याचा पोलीस तपास करत आहेत.