गुंतवणुकीच्या आमिषाने महिलेची आठ कोटीची फसवणुक

अंधेरीतील घटना; व्यावसायिक काका-पुतण्याविरुद्ध गुन्हा

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२९ जून २०२४
मुंबई, – व्यवसाय वाढीसाठी पैशांची गरज असल्याची बतावणी करुन व्यवसायात गुंतवणुक केल्यास आकर्षक परवाता देण्याचे आमिष दाखवून एका ५९ वर्षांच्या महिलेची सुमारे आठ कोटीची फसवणुक झाल्याचा प्रकार अंधेरी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी अतुल अरविंद कामदार आणि खिमजी कामदार या काका-पुतण्या व्यावसायिकाविरुद्ध ओशिवरा पोलिसांनी भादवीसह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. गुंतवणुकीसाठी घेतलेल्या पैशांचा अपहार करुन या महिलेची फसवणुक केल्याचा या दोघांवर आरोप असून लवकरच त्यांची पोलिसांकडून चौकशी होणार आहे.

मनप्रित भाटिया ही महिला अंधेरीतील लोखंडवाला कॉम्प्लेक्स परिसरात राहत असून ती पूर्वी फॅशन डिझाईनर म्हणून काम करत होती. २०१२ साली तिची ओळख दूध व्यावसायिक असलेला अतुल कामदारशी झाली होती. त्याची एक खाजगी कंपनी असून तो आरे कॉलनीतून दूध वितरणाचे काम करत होता. त्याला त्याच्या व्यवसाय वाढीसाठी पैशांची गरज होती. त्यामुळे त्याने तिला व्यवसायात आर्थिक मदत करण्याची विनंती करताना तिला गुंतवणुकीवर चांगला नफा मिळवून देण्याचे आश्‍वासन दिले होते. त्याच्या आमिषाला बळी पडून तिने त्याच्या व्यवसायात गुंतवणुकीचा निर्णय घेतला होता. गुंतवणुक करण्यापूर्वी ती त्याच्या मुंबई समाचार मार्ग, भारत हाऊसच्या ए. के ट्रेडर्स कंपनीच्या कार्यालयात गेली होती. तिथे तिला ती इमारत त्याच्या मालकीचे असल्याचे समजले होते. तिथेच तिची त्याने त्याचा काका खिमजी कामदारशी ओळख करुन दिली होती. यावेळी खिमजीनेही तिला अतुल हा प्रचंड मेहनती असून त्याच्या व्यवसायात बिनधास्त गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे तिने टप्याटप्याने १ जानेवारी २०१२ ते १० जून २०२४ या कालावधीत त्याच्या व्यवसायात सुमारे आठ कोटी रुपयांची गुंतवणुक केली होती. त्यापैकी पंधरा कराराची प्रत त्याने तिला दिले होते, मात्र उर्वरित प्रत देण्यास तो टाळाटाळ करत होता. सुरुवातीला त्याने तिला व्याजाची रक्कम दिली, मात्र ही रक्कमही त्याने तिला गुंतवणुक करण्यास भाग पाडले होते.

काही महिने व्याजाची रक्कम दिल्यानंतर त्याने उर्वरित रक्कम देण्यास टाळाटाळ सुरु केली होती. सरकारी धोरणातील बदल, नोटबंदी आणि व्यावसायिक स्पर्धेतून त्याला व्यवसायात प्रचंड नुकसान झाल्याचे तो सांगत होता. मात्र नुकसानीनंतरही त्याने तिला तिची मूळ रक्कमेसह व्याजाची रक्कम देण्याचे आश्‍वासन दिले होते. मार्च २०१८ साली त्याने तिला सुमारे आठ लाख रुपये दिले होते. नंतर त्याने त्याने तिला पैसे देणे बंद केले होते. अतुल आणि खिमजी हे दोघेही विविध कारण सांगून तिची दिशाभूल करत होते. तिला खोटे आश्‍वासन देत होते. त्यामुळे तिने जुलै २०१८ साली ओशिवरा पोलिसांत या दोघांविरुद्ध तक्रार केली होती. ही माहिती समजताच अतुलने तक्रार मागे घेण्याची विनंती करुन तिला पैसे देणयाचे मान्य केले होते. त्यामुळे सप्टेंबर २०१९ साली तिने तिची तक्रार मागे घेतली होती. याच दरम्यान त्याने तिला पाच कोटीचा धनादेश दिला होता, मात्र हा धनादेश बँकेत न वटता परत आला होता. त्यामुळे तिने अतुलला संपर्क साधण्याच प्रयत्न केला, मात्र त्याचा संपर्क होऊ शकला नाही. अतुल आणि खिमजी यांनी कट रचून व्यवसायात गुंतवणुक करण्यास प्रवृत्त करुन गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून तिची फसवणुक केली होती. त्यामुळे तिने अंधेरीतील लोकल कोर्टासह विशेष सेशन कोर्टात या दोघांविरुद्ध एक याचिका सादर केली होती.

सेशन कोर्टाच्या याचिकेवर सुनावणी देताना ओशिवरा पोलिसांना या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करुन गुन्हा दाखल करण्याचे तसेच दोषीवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर तिने ओशिवरा पोलिसांना घडलेला प्रकार सांगून अतुल अरविंद कामदार आणि खिमजी कामदार यांच्याविरुद्ध सुमारे आठ कोटीची फसवणुक केल्याप्रकरणी तक्रार केली होती. या तक्रारीनंतर दोन्ही आरोपीविरुद्ध पोलिसांनी १२० बी, ४०९, ४१५, ४२० भादवीसह महाराष्ट्र ठेवीदाराच्या अधिनियम कायदा कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून लवकरच अतुलसह खिमजीची पोलिसांकडून चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page