आकर्षक व्याजाचे गाजर दाखवून पावणेतीन कोटीची फसवणुक

गुंतवणुकदारांना शेअरमध्ये गुंतवणुक करण्यास प्रवृत्त करुन गंडा घातला

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२६ जुलै २०२४
मुंबई, – आकर्षक व्याजाचे गाजर दाखवून अनेकांना विविध गुंतवणुक योजनेत गुंतवणुक करण्यास प्रवृत्त करुन सुमारे पावणेतीन कोटीची पिता-पूत्राने फसवणुक केल्याचा धक्कादायक प्रकार भांडुप परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी सिद्धेश सूर्यकांत मोहिरे आणि सूर्यकांत मोहिरे या दोघांविरुद्ध भांडुप पोलिसांनी भादवीसह महाराष्ट्र ठेवीदाराच्या अधिनियम कायदा कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या पिता-पूत्रांनी त्यांच्या कंपनीच्या माध्यमांतून शेअरमार्केटमध्ये गुंतवणुकीचे आमिषाने चार ते सहा टक्के व्याज देण्याचे आमिष दाखवून गंडा घातल्याचे तपासात उघडकीस आले आहे. गुन्हा दाखल झाल्याने या दोघांची लवकरच पोलिसांनी चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे.

प्रकाश लक्ष्मण कामथे हे घाटकोपरच्या भटवाडीचे रहिवाशी असून ते एका खाजगी जिममध्ये प्रशिक्षक म्हणून काम करतात. याच जिममध्ये त्यासंची सिद्धेश मोहिरेशी ओळख झाली होती. सिद्धेश हा त्यांच्या जिममध्ये नियमित येत होता. त्यातून त्यांची चांगली मैत्री झाली होती. यावेळी त्याने जिममध्ये येणार्‍या प्रत्येकाला त्याच शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचा व्यवसाय असून त्याने अनेकांना शेअरमधून चांगला फायदा मिळवून दिला आहे. या योजनेची माहिती जाणून घेण्यासाठी त्याने प्रकाश कामथे यांच्यासह अन्य लोकांना त्याच्या घाटकोपर येथील श्रेयस सिनेमागृहाजवळील भावेश्‍वर आर्किटेक्टमधील धनयश इन्व्हेस्टमेंट कार्यालयात बोलाविले होते. तिथेच त्याचे त्याचे वडिल सूर्यकांत मोहिरे यांच्याशी त्यांची ओळख करुन दिली होती. त्यांची धनसंपत्ती इंटरप्रायजेस आणि धनयश इन्व्हेस्टमेंट नावाच्या दोन कंपन्या आहेत. या दोन्ही कंपन्यात गुंतवणुक केलेली रक्कम ते दोघेही शेअरमार्केटमध्ये गुंतवणुक करतात. त्यातून त्यांना आतापर्यंत लाखो रुपयांचा फायदा झाला होता. या फायदा त्यांनी त्यांच्या कंपनीसह गुंतवणुक करणार्‍या लोकांना दिली आहे. त्यांचा विश्‍वास बसावा म्हणून या पिता-पूत्रांनी त्यांना त्यांच्या कंपनीत अनेकांनी गुंतवणुक केल्याचे दाखविले होते. विशेष म्हणजे या गुंतवणुकदारांना वेळोवेळो योग्य मोबदला मिळत असल्याचे दाखवून त्यांना त्यांच्या कंपनीत गुंतवणुकीचा सल्ला दिला होता. त्यामुळे प्रकाश कामथे यांनी त्यांच्या कंपनीत सहा लाखांची गुंतवणुक केली होती. यावेळी त्यांना दरमहा सहा टक्के म्हणजेन ३६ हजार रुपयांचे व्याज देण्याचे आश्‍वासन देण्यात आले होते.

डिसेंबर २०२२ रोजी ही रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा झाली होती. त्यामुळे त्यांनी त्यांच्या कुटुंबियांसह नातेवाईक आणि मित्रांना गुंतवणुकीची ही योजना सांगून त्यांनाही कंपनीत गुंतवणुक करण्यास सांगितले होते. त्यांच्यावर विश्‍वास ठेवून त्यांचा भाऊ अनिल कामथे, नातेवाईक विलास कामथे, दिनेश धनरे, संदीप कांबळे, विशाखा शिंदे, महेश वजगे, अनिकेत कालिनकर यांच्यासह इतरांनी त्यांच्या कंपनीत लाखो रुपयांची गुंतवणुक केली होती. सुरुवातीला त्यांनी सर्वांना व्याजाची रक्कम दिली, मात्र नंतर व्याजाची रक्कम देणे बंद केले होते. विचारणा केल्यानंतर सिद्धेशने त्याची प्रकृती ठिक नसल्याचे कारण सांगून नंतर व्याजाची रक्कम देण्याचे आश्‍वासन दिले. मात्र त्यांनी त्याचे आश्‍वासन पाळले नाही. नंतर तो त्यांचा कॉल घेत नव्हता. अनेकदा त्याचा मोबाईल बंद येत होता. हा प्रकार संशयास्पद वाटताच त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरु केली होती.

या चौकशीदरम्यान सिद्धेश आणि सूर्यकांत मोहिरे यांच्या धनसंपत्ती इंटरप्रायजेस आणि धनयश इन्व्हेस्टमेंट कंपनीत त्यांच्यासह २९ गुंतवणुकदारांनी ३ कोटी ८३ लाख ९१ हजार रुपयांची गुंतवणुक केली होती. या सर्वांना चार ते सहा टक्के व्याजाचे आमिष दाखविण्यात आले होते. त्यापैकी या दोघांनी व्याजापोटी अनेकांना १ कोटी १३ लाख ३१ हजार ७५७ रुपये परत केले. मात्र उर्वरित सुमारे पावणेतीन लाखांचा परस्पर अपहार करुन संबंधित सर्व गुंतवणुकदारांची फसवणुक केली होती. हा प्रकार लक्षात येताच प्रकाश कामथे यांनी मे २०२४ रोजी भांडुप पोलीस ठाण्यात दोन्ही पिता-पूत्रांविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर दोन दिवसांपूर्वी सिद्धेश आणि त्याचे वडिल सूर्यकांत मोहिरे यांच्याविरुद्ध पोलिसांनी ४०९, ४२०, ३४ भादवी सहकलम ३, ४ महाराष्ट्र ठेवीदाराच्या अधिनियम कायदा कलमांतर्गत गुन्हा दाखल केल आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून लवकरच या दोन्ही आरोपींना चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजाविण्यात येणार आहे. आतापर्यंत २९ गुंतवणुकदारांची सुमारे पावणेतीन कोटीची फसवणुक झाली असली तरी फसवणुकीचा हा आकडा त्यापेक्षा जास्त असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page