आकर्षक व्याजाचे गाजर दाखवून पोलीस कुटुंबियांची फसवणुक
दिड वर्षांपासून वॉण्टेड असलेल्या कंपनीच्या मालकाला अटक
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१२ एप्रिल २०२४
मुंबई, – गुंतवणुकीवर आकर्षक व्याजाचे गाजर दाखवून एका पोलीस कुटुंबियांची सुमारे साडेचौदा लाखांची फसवणुक करुन पळून गेलेल्या कंपनीच्या वॉण्टेड मालकाला दिड वर्षांनी गजाआड करण्यात मालाड पोलिसांना यश आले आहे. विनित अनिल जामसांडेकर असे आरोपीचे नाव असून अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले. तक्रारदाराचे वडिल पोलीस खात्यातून निवृत्त झाले असून त्यांच्या कुटुंबियांसह अनेकांनी विनित जामसांडेकर यांनी गुंतवणुकीच्या नावाने कोट्यवधी रुपयांची फसवणुक केल्याचे बोलले जाते.
प्रविण मनोहर आचरेकर हे ६० वर्षांचे वयोवृद्ध त्यांच्या कुटुंबियांसोबत मालाड येथे राहत असून ते ओनिडा कंपनीतून निवृत्त झाले आहेत. त्यांची पत्नी डॉक्टर, मुलगा खाजगी कंपनीत आहे तर वडिल पोलीस खात्यातून निवृत्त झाले आहे. सतीश हजारे हा त्यांचा परिचित असून त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. जून २०१५ रोजी सतीश हा त्याच्या पत्नीसोबत त्यांच्या घरी आला होता. यावेळी त्यांनी त्यांना एक गुंतवणुक योजनेची माहिती दिली होती. बोरिवली येथे व्हाब्रंट केअर प्लस प्रायव्हेट लिमिटेड नावाची एक कंपनी असून कंपनीचे मालक विनित जामसांडेकर आहे. ही कंपनीत विविध हॉस्पिटलमध्ये साहित्य पुरविण्याचे काम करते. या कंपनीत गुंतवणुक केल्यास त्यांना दरमाह चार टक्के आकर्षक व्याज मिळेल असे सांगून त्यांना कंपनीत गुंतवणुक करण्याचा सल्ला दिला होता. या कंपनीत अनेकांनी गुंतवणुक केली असून त्यांना गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळाल्याचे कागदपत्रे दाखविले होते. त्यामुळे त्यांना त्याच्यावर विश्वास बसला होता. त्याच्या सल्ल्यानुसार त्यांनी कंपनीत गुंतवणुकीचा निर्णय घेतला. ठरल्याप्रमाणे ऑगस्ट २०१५ ते डिसेंबर २०१६ या कालावधीत त्यांनी त्यांच्यासह त्यांची पत्नी मंगला प्रविण आचरेकर, मुलगा मोहित प्रविण आचरेकर, मंगला प्रविण आचरेकर यांनी विनित जामसांडेकर याच्या कंपनीत सुमारे साडेचौदा लाखांची गुंतवणुक केली होती. या गुंतवणुकीनंतर विनीतसोबत त्यांचा एका शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर करार झाला होता. एप्रिल २०१७ पर्यंत त्यांना चार टक्क्याप्रमाणे गुंतवणुकीवर नियमित व्याजदर मिळाले होते. मात्र नंतर कंपनीने व्याजदर देणे बंद केले होते. याबाबत विचारणा केल्यानंतर कंपनीकडून विविध कारण सांगून लवकरच त्यांची मूळ रक्कमेसह व्याजाची रक्कम दिली जाईल असे सांगण्यात येत होते. मात्र कंपनीने कोणालाही पैसे परत केले नाही. चौकशीदरम्यान कंपनीत त्यांच्यासह अनेकांनी कोट्यवधी रुपयांची गुंतवणुक केली होती.
मात्र कोणालाही एप्रिल २०१७ नंतर मूळ रक्कमेसह व्याजाची रक्कम मिळाली नाही. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच प्रविण आचरेकर यांनी मालाड पोलिसांत विनित जामसांडेकर याच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर एप्रिल २०२३ रोजी त्याच्याविरुद्ध पोलिसांनी ४०६, ४०९, ४२० भादवी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत गेल्या दिड वर्षांपासून विनित हा फरार होता. अखेर पळून गेलेल्या विनितला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. तक्रारदारासह त्याच्या कुटुंबियांनी सुमारे साडेचौदा लाखांची फसवणुक झाली असली तरी ही फसवणुक त्यापेक्षा जास्त असल्याचे पोलिसांनी सांगितले.