गुंतवणुकीसह फ्लॅटच्या आमिषाने वयोवृद्ध व्यावसायिकाची फसवणुक
एक कोटीच्या फसवणुकीप्रकरणी आठजणांविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१४ जून २०२४
मुंबई, – मालाड येथे सुरु असलेल्या प्रोजेक्टमध्ये गुंतवणुकीवर आकर्षक व्याजासह फ्लॅटच्या आमिषाने एका ७१ वर्षांच्या वयोवृद्ध व्यावसायिकाची सुमारे एक कोटीची फसवणुक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी आठजणांविरुद्ध मालाड पोलिसांनी भादवीसह महाराष्ट्र मालकी फ्लॅट अधिनियम कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविला आहे. महेंद्र गांगजी गोगरी, विणा महेंद्र गोगरी, चिंतन सुरेश शाह, ज्योती फेनिल लक्ष्मीचंद शाह, सुरेश खिमचंद शाह, हेमलता लक्ष्मीचंद गोगरी आणि कल्पना रमेश गांगर अशी या आठजणांची नावे असून ते सर्वजण रोहन डेव्हलपर्स कंपनीचे संचालक आहेत. या गुन्ह्यांत अद्याप कोणावर अटकेची कारवाई झाली नसून चौकशी सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.
कांतीलाल प्रेमजी मारु (७१) हे माटुंगा येथील देवधर रोड, माऊंट कियारा अपार्टमेंटमध्ये राहतात. त्यांची क्लासिक स्टिल्स नावाची भांडी तयार करण्याची एक खाजगी कंपनी आहे. ऑगस्ट २०१० रोजी त्यांची महेंद्रसोबत त्याच्या मालाड येथील कार्यालयात भेट झाली होती. या भेटीत त्याने त्यांना रोहन डेव्हलपर्स ही बांधकाम क्षेत्राशी संबंधित कंपनी असून कंपनीचे मालाड येथील उंदेराई रोडवर एक मोठा प्रोजेक्ट सुरु आहे. या प्रोजेक्टसाठी त्यांना आर्थिक निधीची गरज आहे. त्यामुळे त्यांनी त्यांच्या प्रोजेक्टमध्ये गुंतवणुक करावी, या गुंतवणुकीवर त्यांना दरमाह दिड टक्के व्याज देण्याचे आश्वासन दिले होते. जर कंपनीने त्यांची रक्कम व्याजासहीत परत केली नाहीतर त्यांना त्याच प्रोजेक्टमध्ये एक सातशे चौ. फुटाचा फ्लॅट दिला जाईल. याबाबत कायदेशीर करार केला जाणार असून त्यात फसवणुक होणार नाही याची ग्वाही दिली होती. त्याच्यावर विश्वास ठेवून त्यांनी रोहन डेव्हलपर्स कंपनीत गुंतवणुकीचा निर्णय घेतला होता. ठरल्याप्रमाणे त्यांच्यात एक करार झाला होता. त्यानंतर त्यांनी कंपनीच्या बँक खात्यात सप्टेंबर २०१० ते जुलै २०१४ या कालावधीत टप्याटप्याने एक कोटी पाच लाख रुपयांची गुंतवणुक केली होती. या गुंतवणुकीनंतर त्यांना २०१५ पर्यंत कंपनीने व्याजापोटी ४१ लाख रुपये दिले होते. मात्र नंतर कंपनीने व्याजाची रक्कम देणे बंद केले.
याबाबत विचारणा केल्यानंतर कंपनीच्या संचालकाकडून विविध कारण सांगून टाळण्याचा प्रयत्न झाला होता. त्यामुळे त्यांनी स्वत घटनास्थळी जाऊन प्रोजेक्ट साईटची सध्याच्या स्थितीची पाहणी केली होती. यावेळी तिथे काहीच प्रगती झाली नसल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी संचालकाकडे त्यांच्या गुंतवणुकीसह व्याजाच्या रक्कमेची मागणी सुरु केली होती. मात्र त्यांच्याकडून त्यांना काहीच प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे त्यांनी बोरिवलीतील लोकल कोर्टात कंपनीच्या विरोधात एक याचिका सादर केली होती. या याचिकेवर अलीकडेच सुनावणी होऊन कोर्टाने मालाड पोलिसांनी कंपनीच्या आठही संचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करुन तपास करण्याचे आदेश करण्याचे आदेश दिले होते. या आदेशानंतर पोलिसांनी कांतीलाल मारु यांची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली होती. त्यांच्या तक्रार अर्जानंतर महेंद्र गोगरी, विणा गोगरी, चिंतन शाह, ज्योती शाह, सुरेश शाह, हेमलता गोगरी आणि कल्पना गांगर यांच्याविरुद्ध अपहारासह फसवणुक तसेच महाराष्ट्र मालकी फ्लॅट अधिनियम कायद्याच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.