गुंतवणुकीच्या बहाण्याने नौसेनेच्या निवृत्त अधिकार्‍याची फसवणुक

४६ लाखांच्या फसवणुकीप्रकरणी कंपनीच्या मालकासह इतराविरुद्ध गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
३ सप्टेंबर २०२४
मंबई, – चांगला परतावा देण्याची बतावणी करुन गुंतवणुकीच्या बहाण्याने एका नौसेनेच्या निवृत्त अधिकार्‍याची सुमारे ४६ लाखांची फसवणुक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी रेनबो बिझनेस सेंटर कंपनीच्या मालकासह इतर आरोपीविरुद्ध भांडुप पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपी भांडुप येथील कार्यालय बंद करुन पळून गेल्याने त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

५४ वर्षांचे तक्रारदार अमित अनिल परुळकर गिरगाव येथील जेएसएस रोड परिसरात राहतात. २०१४ साली ते नौसेनेतून सायंटिफिक अधिकारी म्हणून निवृत्त झाले आहेत. त्यांची आई आजारी असल्याने ते सध्या घरी असतात तर त्यांची पत्नी नोकरी करते. आठ वर्षांपूर्वी त्यांनी रेनबो बिझनेस सेंटरची एक जाहिरात पाहिली होती. त्यात रमेश ऊर्फ करण पटेल या व्यक्तीचा मोबाईल क्रमांक देण्यात आला होता. या कंपनीतील गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळत असल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे ते त्यांच्या पत्नीसोबत भांडुप येथील कंपनीच्या कार्यालयात गेले होते. यावेळी त्यांची करण पटेलशी भेट झाली होती. करणने त्यांना कंपनीच्या विविध गुंतवणुक योजनेची माहिती दिली होती. ही कंपनीत मुंबईसह हैद्राबाद येथील कार्पोरेट कंपन्यांशी करार करुन चारचाकी कार विकत घेऊन ते कार विविध कार्पोरेट कंपन्यांना भाडेतत्त्वावर देऊन गुंतवणुकदारांना चांगला परतावा देत असल्याचे सांगितले. त्यामुळे त्यांनी कंपनीत गुंतवणुक करण्याचा निर्णय घेतला होता. सुरुवातीला त्यांनी एक लाख रुपयांची गुंतवणूक केली होती. या गुंतवणुकीवर त्यांना चार ते पाच आठवडे प्राफ्रिटची रक्कम मिळाली होती. ही रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होत होती. त्यानंतर त्यांच्याकडे आणखीन बारा लाखांची रक्कम गुंतवणूक केली होती. त्यासाठी त्यांच्या पत्नीने एका बँकेतून कर्ज काढले होते.

चौकशीदरम्यान त्यांना कंपनीत इतर सात ते आठजणांनी गुंतवणुक केली असून त्यापैकी त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांनी सर्वाधिक ३७ लाखांची गुंतवणुक त्यांनी केली होती. काही महिन्यानंतर करण पटेलने महाडच्या पोलादपूर येथे एक जमिन खरेदी करण्याचा निर्णय घेतला असून त्यात गुंतवणुक केल्यास त्यांना दुप्पट रक्कम देण्याचे आमिष दाखविले होते. त्यामुळे त्यांनी त्यांच्या कुटुंबियांसोबत चर्चा करुन जमिनीच्या गुंतवणुकीवर गुंतवणुकीचा निर्णय घेतला होता. ठरल्याप्रमाणे त्यांच्यासह त्यांच्या पत्नीने जमिन खरेदी व्यवहारातही गुंतवणुक केली होती. अशा प्रकारे फेबुवारी ते जून २०१६ या कालावधीत अमीत परुळकर यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांनी विविध गुंतवणुक योजनेत करण पटेलकडे ४६ लाख ५० हजाराची गुंतवणुक केली होती. मात्र या गुंतवणुकीनंतर काही महिन्यानंतर त्याने त्यांना प्राफिटची रक्कम देणे बंद केले. विचारणा केल्यानंतर करणसह इतर आरोपी टाळाटाळ करत होते.

काही महिन्यानंतर ते भांडुप येथील कार्यालय बंद करुन पळून गेले होते. चांगला परतावा देतो असे सांगून करणसह इतरांनी फसवणुक केल्याचे लक्षात येताच त्यांनी भांडुप पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर रमेश ऊर्फ करण पटेलसह इतराविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पळून गेलेल्या आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. या टोळीने अमीत परुळकर यांच्यासह अनेक गुंतवणुकदारांना लाखो रुपयांना गंडा घातल्याचे बोलले जाते. त्यामुळे फसवणुक झालेल्या लोकांनी भांडुप पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page