मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२९ मार्च २०२४
गडचिरोली, – गडचिरोलीतील एका गेस्ट हाऊसमधून आयपीएल सामन्यावर लाखो रुपयांची बेटींग घेणार्या एका टोळीचा अहेरी पोलिसांनी पर्दाफाश केला. याप्रकरणी मुख्य आरोपीसह दहाजणांना पोलिसांनी अटक केली. निखील मल्लया दुर्गे, आसिफ फकीर मोहम्मद शेख, धनंजय राजरत्नम गोगीवार, निखील गुंडावार, प्रणित श्रीरामवार, अक्षय गनमुकलवार, फरमान शेख, फरदीन पठाण, इरफान इक्बाल शेख संदीप गुडपवार अशी या दहाजणांची नावे आहेत. अटकेनंतर या सर्वांना तेथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते.
देशात सध्या आयपीएलचा सीजन सुरु असून विविध शहरात आयपीएलचे सामने खेळविले जात आहे. त्याचाच फायदा घेऊन काहीजण आयपीएल सामन्यांवर मोठ्या प्रमाणात ऑनलाईन बेटींग घेत आहेत. त्यामुळे अशा बेटींग घेणार्या बुकींविरुद्ध पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही मोहीम सुरु असताना गडचिरोलीतील अहेरी हद्दीतील बालाजी गेस्ट हाऊसमध्ये काहीजण आयपीएल सामन्यांवर बेटींग घेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीची पोलीस अधिक्षक निलोत्पल यांनी गंभीर दखल घेत पोलिसांना तिथे कारवाईचे आदेश दिले होते. या आदेशानंतर पोलीस अधिक्षक निलोत्पल, अप्पर पोलीस अधिक्षक कुमार चिंता, यतीश देशमुख एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कोकाटे, पोलीस निरीक्षक दशरथ वाघमोडे, पोलीस उपनिरीक्षक जनार्दन काळे, गवळी, पोलीस हवालदार कांबळे, संजय बोलीवार, पठाण, मडावी, शेंडे, केंद्रे, देवेंद्र दुर्गे, सुरज करपे, दहिफळे, भंडे यांनी शनिवारी बालाजी गेस्ट हाऊसमधून छापा टाकून आयपीएल सामन्यावर ऑनलाईन बेटींग घेणार्या निखिल दुर्गे आणि आसिफ शेख या दोघांना अटक केली. त्यांच्याकडून पोलिसांनी चार मोबाईल आणि साडेनऊ हजार रुपयांची कॅश जप्त केली होती. त्यांच्या चौकशीतून इतर काही आरोपींची नावे समोर आली होती. या माहितीनंतर पोलिसांनी त्यांच्या इतर आठ सहकार्यांना विविध परिसरातून शिताफीने ताब्यात घेतले होते.
ही टोळी काही दिवसांपासून आयपीएलच्या बहुतांश सामन्यावर बेटींग घेत असल्याचे तपासात उघडकीस आले. या टोळीचा संदीप गुडपवार हा मुख्य सूत्रधार असून तोच इतर सहकार्यांच्या मदतीने सामन्यावर ऑनलाईन बेटींग घेत असल्याचे उघडकीस आले आहे. त्यासाठी त्यांनी एक खाजगी ऍप सुरु केले होते. या ऍपच्या माध्यमातून ही बेटींग घेतली जात होती. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर सर्व आरोपींना दुसर्या दिवशी लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते.
अशा प्रकारच्या अवैध सट्टेबाजीपासून सर्वसामान्यांनी दूर राहून जर कोणी असे अवैध व्यवसाय चालवत असतील तर त्याची माहिती पोलीस विभागाला द्यावी असे आवाहन गडचिरोलीचे पोलीस अधिक्षक निलोत्पल यांनी केले आहे.