आयपीएल सामन्यांवर बेटींग घेणार्‍या तीन बुकींना अटक

ठाण्याच्या विशेष कृती दलासह खंडणी विरोधी पथकाची कामगिरी

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२६ मार्च २०२४
ठाणे, – गुरुवारी हैद्राबाद येथे खेळविण्यात आलेल्या आरसीबी आणि सनराजर्स हैद्राबाद यांच्यातील आयपीएल सामन्यांवर कोनगावातील एका लॉजमध्ये बेटींग घेणार्‍या तीन बुकींना ठाण्याच्या विशेष कृती दलासह खंडणीविरोधी पथकाच्या अधिकार्‍यांनी अटक केली. शानू ललित बेरीवाल, रजत बाबूला शर्मा आणि विजय सिताराम देवगण अशी या तिघांची नावे असून ते तिघेही छत्तीसगढच्या रायगडचे रहिवाशी आहेत. अटकेनंतर या तिघांनाही लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते.

भिवंडीतील कोनगाव, के. एन पार्क परिसरात एक लॉज असून या लॉजमध्ये काहीजण आयपीएल सामन्यांवर ऑनलाईन बेटींग घेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी अतिरिक्त पोलीस आयुक्त पंजाबराव उगले, पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष कृती दलासह खंडणीविरोधी पथकाने गुरुवारी या लॉजमध्ये छापा टाकला होता. यावेळी एका रुममध्ये आयपीएल सामन्यावर ऑनलाईन बेटींग घेणार्‍या शानू बेरीवाल, रजत शर्मा आणि विजय देवगण या तिघांनाही पोलिसांनी चौकशीसाठी ताब्या घेतले. तिन्ही आरोपी मूळचे छत्तीसगढचे रहिवाशी असून यातील शानूचा ट्रॅव्हेल्सचा व्यवसाय आहे. या तिघांनी त्यांच्याकडील लॅपटॉपमध्ये सुभलाभ नावाचे एक सॉफ्टवेअर अपलोड केले होते. या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून ते तिघेही आयपीएल सामन्यावर बेटींग घेत होते. त्यांनी टिव्हीवर लाईव्ह मॅच पाहून सट्टा लावणार्‍या व्यक्तीकडून ११ लाख ८६ हजार ८११ बेटींग घेतली होती. अन्य एका मोबाईलवरुन ते तिघेही बुकी जानूच्या संपर्कात होते. त्याच्या मदतीने त्यांनी छत्तीसगढ येथे सात लाख तीन हजार रुपयांचे बेटींग घेतल्याचे उघडकीस आले. त्यांनी बेटींगसाठी बोगस कागदपत्रांच्या मदतीने सिमकार्ड मिळवून शासनाची तसेच मोबाईल कंपनी फसवणुक केली.

या कारवाईत पोलिसांनी बारा मोबाईल, एक लॅपटॉप, एक टॅब असा १ लाख ९७ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्यांना शुक्रवारी लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. जानूला पोलिसांनी पाहिजे आरोपी दाखविले असून त्याचा आता पोलीस शोध घेत आहेत. त्याच्या अटकेसाठी एक टिम लवकरच छत्तीसगढ येथे जाणार आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, सहपोलीस आयुक्त ज्ञानेश्‍वर चव्हाण, अतिरिक्त पोलीस आयुक्त पंजाबराव उगले, पोलीस उपायुक्त शिवराज पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त राजकुमार डोंगरे, शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणीविरोधी पथकाचे महिला पोलीस निरीक्षक वनिता पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण गोरे, भूषण कापडणीस, सुनिल तारमळे, पोलीस उपनिरीक्षक विजयकुमार राठोड, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुभाष तावडे, कल्याण ढोकणे, संजय बाबर, पोलीस हवालदार सचिन शिंपी, योगीराज कानडे, संजय राठोड, गणेश गुरसाळी, महिला पोलीस हवालदार शितल पावसकर, महिला पोलीस शिपाई मयुरी भोसले, पोलीस शिपाई तानाजी पाटील, अरविंद शेजवळ, विनोद ढाकणे, पोलीस नाईक चालक भगवान हिवरे यांनी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page