मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
13 मे 2025
मुंबई, – मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी देवेन भारती यांची नियुक्ती झाल्यानंतर गृहविभागाने राज्यातील इतर आयपीएस अधिकार्यांच्या बदलीचे सत्र सुरु केले आहे. शुक्रवारी सहा आयपीएस अधिकार्यांच्या बदल्यानंतर मंगळवारी आणखीन सात वरिष्ठ आयपीएस अधिकार्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळे गेल्या चार दिवसांत तेरा आयपीएस अधिकार्यांच्या बदल्या झाल्या असून आगामी काळात मोठ्या प्रमाणात बदल्याचे आदेश निघतील असे म्हटले आहे. त्यात सहपोलीस आयुक्तासह अतिरिक्त पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त दर्जाच्या काही अधिकार्याचा समावेश असेल.
शुक्रवारी 9 मेला राज्यातील सहा वरिष्ठ आयपीएस अधिकार्यांच्या गृहविभागाने बदल्या केल्या होत्या. त्यात राज्याचे नागरी संरक्षण विभागाचे संचालक प्रभातकुमार यांना बढती देऊन त्याच ठिकाणी नियुक्ती करण्यात आली होती. पुणे गुन्हे अन्वेषण विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक यांची राज्याच्या लोहमार्ग विभागाच्या पोलीस महासंचालकपदी, राज्याचे नियोजन व समन्वय विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक सुनिल रामानंद यांची पुण्याच्या गुन्हे अन्वेषण विभागात, प्रशिक्षण व खास पथकाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक राजकुमार व्हटकर यांची राज्य राखीव पोलीस बलात, प्रशासन विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक के. एम. मल्लिकार्जुन प्रसन्ना यांची प्रशिक्षण व खास पथकात तर लोहमार्ग विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक प्रविण साळुंके यांची महामार्ग सुरक्षा विभागात बदली दाखविण्यात आली होती.
या बदल्यांना काही दिवस उलटत नाही तोवर मंगळवारी राज्यातील इतर सात आयपीएस अधिकार्यांच्या बदल्याचे आदेश जारी करण्यात आले. त्यात रेल्वेचे पोलीस आयुक्त रविंद्र शिसवे यांची महाराष्ट्र राज्याच्या राज्य गुप्तवार्ता विभागात तर उत्तर विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त यांची राज्याच्य प्रशासन विभागाच्या विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे. मंगळवारी गृहविभागाचे सहसचिव व्यकंटेश भट यांनी आणखीन सहा वरिष्ठ आयपीएस अधिकार्यांच्या बदलीचे आदेश जारी केले. या बदल्या रुटीन असून आगामी काळात आणखीन काही अधिकार्यांच्या बदल्याचे आदेश जारी होणार आहेत.
मंगळवारी झालेल्या बदल्यांमध्ये मुंबई लोहमार्गचे पोलीस आयुक्त रविंद्र शिसवे यांची राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्त, राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्त शारदा वसंत निकम यांची अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षक, नागपूर शहराचे सहपोलीस आयुक्त निसार तांबोळी यांची नागपूरच्या राज्य राखीव पोलीस बलाच्या विशेष पोलीस महानिरीक्षक, अमरावतीचे पोलीस आयुक्त एन. डी रेड्डी यांची नागपूर शहराच्या सहपोलीस आयुक्त, बदलीच्या प्रतिक्षेत असलेल्या सुप्रिया पाटील याव यांची राज्याच्या विशेष पोलीस महानिरीक्षक आस्थपना विभागात, राज्य राखीव पोलीस बलाचे विशेष पोलीस महानिरीक्षक राजीव जैन यांची सागरी सुरक्षा विभागाच्या विशेष पोलीस महानिरीक्षक तर उत्तर विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त अभिषेक त्रिमुखे यांची राज्याच्या प्रशासन विभागाच्या विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून बदली दाखविण्यात आली आहे. या सातही अधिकार्यांनी त्यांच्या नव्याने नियुक्त केलेल्या बदल्याच्या ठिकाणी रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहे.